Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी कोर्टात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बाजूने लेखी भूमिका मांडण्यात आली. यामध्ये राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे.
मिलिंद पवार यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, भाजप नेते तरविंदर मारवा यांनी राहुल गांधी यांना धमकी देत म्हटले होते की, “ते नीट वागले नाहीत, तर त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारखे होईल.” तसेच भाजपाच्या आणखी एका नेत्याने त्यांना ‘दहशतवादी’ असे संबोधले आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ता सत्यकी यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध लक्षात घेता, राहुल गांधी यांच्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
न्यायालयात दिलेल्या माहितीत असेही नमूद आहे की, भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबद्दल राहुल गांधी यांना पूर्ण आदर आहे. मात्र, खटला पुढे सरकत असताना वाढणारा दबाव आणि बाहेरील असामान्य परिस्थिती न्यायालयाने लक्षात घ्यावी. हा खटला दाखल करणारे लोक धार्मिक वातावरण दूषित करणे, समाजात तेढ निर्माण करणे, निवडणुकीत गैरप्रकार करणे आणि ठराविक उद्योजकांचे हित साधणे यासाठी परिचित असल्याचा उल्लेखही निवेदनात आहे.
राहुल गांधी यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या जहालमतवादी गटांकडून जीवाला धोका असल्याचे विशेष न्यायालयाला कळवले आहे. त्यांच्या या माहितीनंतर आता न्यायालय काय निर्देश देतं? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीच्या निकालावरुन राहुल गांधी यांच्याकडून वारंवार टीका केली जाते. विधानसभा निवडणुकीत इव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर राहुल गांधी यांच्याकडून बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेनंतर अचानक मतदानाची आकडेवारी वाढली, असं म्हणत राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने शंका उपस्थित करण्यात आली आहे.

