Mumbai News : मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. दहिसर पूर्वेकडील केतकीपाडा येथे ११ वर्षीय बालगोविंदाचा सरावादरम्यान खाली कोसळून मृत्यू झाला. कुटुंबाने एकच आक्रोश केला. तर यामुळे सारेच हळहळले आहे.
दहिसर पूर्वच्या केतकीपाडा परिसरातील बालगोविंदांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. नवतरुण गोविंदा पथकाचा बालगोविंदा महेश रमेश जाधव याचा सरावादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास पथकाकडून मानवी थर रचले जात असतानाच महेश वरच्या थरावर चढण्यासाठी स्वार झाला. पण चढत असतानाच त्याचा तोल आणि घात झाला. तो जमिनीवपर कोसळल्याने त्याला जबर मार बसला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या बचावासाठी वेळ मिळाला नाही.
दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटना नेमकी कशी घडली, याचा तपास सध्या दहिसर पोलीस करत आहेत.
यंदा 16 ऑगस्टला दहीहंडीचा उत्सव आहे. मुंबईतील दहीहंडी उत्सव तर जगभरात प्रसिद्ध आहे. हजारो गोविंद पथकं या उत्सवात सहभागी होतात. अत्यंत जिद्दीने आणि उत्साहाने गोविंदांसह सर्वच हा सण साजरा करतात. मानवी मनोऱ्यांचा थरार साऱ्यांना अनुभवायला मिळतो. दिवसभर विविध ठिकाणी मानाच्या हंड्या फोडून मोठमोठी बक्षीसे गोविंदा पथक पटकावतात. दहीहंडी फोडताना अनेक मंडळांकडून सात ते नऊ थर रचले जातात. हे थर रचताना अनेक गोविंदा जखमीही होतात. यामुळे सुरक्षिेतेतेची काळजी घेणे महत्वाचे असते. पण या घटनेमुळे गोविंदांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

