Gondia News: गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारणही विद्यार्थ्याने चिठ्ठीत नमूद केले आहे.
आवेश कुमार, असं गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव असल्याचे समजते. सदर विद्यार्थ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. आवेश हा वर्गात सतत गैरहजर राहत असल्याने प्राध्यापकांनी त्याला समज दिली होती. परीक्षा देण्यासाठी आवश्यक हजेरीही नसल्याने आईवडिलांशी संपर्क साधून प्राध्यापकांशी बोलायला सांगण्यात आले होते. मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केल्याचे महाविद्यालयातील सूत्रांनी सांगितले.
भीषण! कावड यात्रेत भरधाव कार घुसली; 2 भाविकांचा जागीच मृत्यू, 4 जण जखमी
दरम्यान, ‘विद्यार्थ्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्याने केलेल्या कृत्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. सदर विद्यार्थी वर्गात अनेकदा गैरहजर राहत असल्याने त्याला काही बोलले गेले असेल. त्याचा त्याने मनावर परिणाम घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे,’ असे अधिष्ठाता डॉ. कुसुमागर घोरपडे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. मात्र विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शिक्षकाबद्दल धक्कादायक उल्लेख केल्याने खळबळ उडाली असून पोलीस तपासात नेमके काय निष्पण्ण होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

