• Mon. Mar 9th, 2026

    उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 8, 2025
    उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद – महासंवाद

    मुंबई, दि. 8:- उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे तिथे अडकलेल्या 171 पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सर्व सुरक्षित ठिकाणी आहेत. उर्वरीत एक पर्यटक श्रीमती कृतिका जैन यांच्याशीही संपर्क साधण्याचे प्रयत्न  युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) आणि संबंधित यंत्रणेने दिली आहे.

    महाराष्ट्रातील विविध भागांतील सर्व पर्यटक प्रवासी सुखरूप आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडमध्ये काल दाखल झाले असून त्यांनी विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनाची माहिती दिली. तसेच परिसरातील रस्ते देखील पुर्ववत सुरू करून त्याद्वारे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास विभाग राज्यमंत्री अजय टम्टा यांची देखील मंत्री श्री. महाजन यांनी भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी संवाद साधला आहे. राज्य शासनाकडून  महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

    उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात एकूण 172 पर्यटकांपैकी 147 पर्यटक (67 मातली, 6 जॉली ग्रॅन्ट तसेच 74 उत्तरकाशी) येथे सुखरुप आहेत. सुरक्षित असलेल्या पर्यटकांनी त्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार पुढील वाटचाल सुरु केली आहे.  24 पर्यटक हर्षील येथे सुरक्षित असुन त्यांना एअर लिफ्ट करुन ITBP Camp Matali येथे हलविण्यात येणार आहे.

    राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष (SEOC), महाराष्ट्र हे SEOC उत्तराखंड, जिल्हा नियंत्रण कक्ष, DEOC उत्तरकाशी, आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (NERC) नवी दिल्ली यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मदत कार्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

    आपत्ती व्यवस्थापन व  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तराखंड येथे घटनास्थळी शोध व बचावकार्यासाठी दिशानिर्देश देत असून पर्यटकांना सुखरूप स्थळी पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने त्यासंबंधी उपाययोजना राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत.

    संचालक (आपत्ती व्यवस्थापन) उत्तराखंड यांचेकडून संचालक (आपत्ती व्यवस्थापन) मंत्रालय, मुंबई यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार बचाव कार्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे.

    24 पर्यटक हर्षील येथे सुरक्षित असुन त्यांना एअर लिफ्ट करुन ITBP Camp Matali येथे हलविण्यात येणार आहे. गंगोत्री ते हर्षील हेलीपॅड यांचे दरम्यान यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी 10 आयटीबीपी टीम तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीम 30 यात्रेकरूंना संरक्षण देणार आहे. लष्कर, NDRF, SDRF आणि स्थानिक बचाव पथक धराली येथे कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा व रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. संपर्क व रस्ते पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. NERC नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून त्यांचे स्थलांतर अपेक्षित आहे.

    उत्तराखंडमध्ये आपत्ती बचाव कार्यासाठी राजीव स्वरूप, IGP यांच्याद्वारे उपग्रह फोन (Satellite Phone) तैनात करण्यात आले आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र हे बचाव कार्यासाठी आवश्यक समन्वय, माहिती अद्ययावत करणे आणि संबंधित कुटुंबियांना मदत पुरविण्यासाठी कार्यरत आहे.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed