Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये मेळाव्यात आपल्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना चांगलाच इशारा दिला आहे. बीडमधील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. आका का फाका चालणार नाही, असं अजित पवार आपल्या भाषणात रोखठोकपणे म्हणाले.
“आता कोणाचे लाड केले जाणार नाहीत. कोणी आका, ना कोणी फाका, चालणार नाही. सर्वांना समान वागणूक आहे. चांगल्या कामांसाठी मी रात्रीच्या बारा वाजताही तुमच्या पाठीशी उभा राहीन. मात्र विकृत मानसिकतेला थारा नाही. चुकीला माफी नाही”, असं अजित पवार यांनी रोखठोकपणे सांगितलं.
“माझ्यासाठी सर्व सामान आहेत. कोणी मोठ्या बापाचा आहे म्हणून त्याला पाठीशी घालणार नाही. त्याला एक वेळा सांगा, दोनवेळा सांगा मात्र तिसऱ्यांदा त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि परत चुकला तर मग त्याच्यावर मकोका लावा. मग काय त्याला जेलात पिसिंग आणि पिसिंग. बस मग जेलमध्ये. त्यासाठी तुम्ही चांगले वागा”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
“या जगात एकही लढाई न हरलेला राजा एकच होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या मराठवाड्याला साधू-संताची भूमी आहे. माझ्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाची जबाबदारी टाकली आहे. कारण मी कामाचा माणूस आहे. इतर नेते काय काम करतात, त्याच्याशी मला काहीच घेणेदेणे नाही. पण मला कामे करायची आहेत. देशाचे पंतप्रधान विविध राज्यात बिनव्याजी कर्ज कसे देता येईल असे उपक्रम राबवतात”, असं अजित पवार म्हणाले.
“मी खूप लवकर राजकारणात आलो. वयाच्या 30व्या वर्षी मी आमदार झालो. या बीड जिल्ह्याचा विकास पूर्ण कसा करणार हे मी पाहणार आहे. आमच्यावर पवार साहेबांनी खूप लवकर मंत्रिपदाची जबाबदारी दिली म्हणून आम्ही खूप लवकर राज्यात काय आवश्यक आहे याचा अभ्यास केला आणि त्यावर काम करत आलो आहोत”, असं देखील अजितदादा म्हणाले.
“समाजात फार मोठा महिलांचा वर्ग आहे. त्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजना आणत आहोत. येत्या भाऊबीज रोजी हे आम्ही आणत आहोत.माझा शेतकरी राजा म्हणाला की, तुमची बहीण लाडकी मग आम्ही काय दोडके आहोत का? तर आम्ही आता त्यांना शेतात लाईट ही फ्री देत आहोत”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
“काळ सतत बदलत असतो आणि मी नवीन कार्यकर्त्यांना संधी देत असतो. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करणे आवश्यक आहे. मी सकाळी लवकर काम पाहण्यासाठी जात असतो. कारण हा कामाचा पैसा जनतेचा आहे. तो बुडता कामा नये म्हणून मी गुन्हेगार जरी ओळखीचा असेल तरी त्याच्यावर मी गुन्हा दाखल करण्यासाठी मागे बघत नाही. मागेल त्याला घर अशी योजना आम्ही राज्यभर राबवत आहोत. यामुळे चांगली घरे बांधा आणि चांगले संसार करा”, असंदेखील आवाहन अजित पवार यांनी केलं.

