• Thu. Jun 18th, 2026

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी अचानक गोंधळ, राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात काय घडलं?

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी अचानक गोंधळ, राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात काय घडलं?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असताना राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात अचानक मोठा गोंधळ उडाला. काही आंदोलकांनी आपल्या जागेवर उठून घोषणाबाजी केली. खालिद का सिनेमावर बंदी आणा, अशी मागणी या आंदोलकांनी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी झाली. यावेळी ‘ खालिद का शिवाजी ‘ सिनेमाला विरोध करत घोषणाबाजी करण्यात आली आहे. इतिसाहाचं विकृतीकरण बंद करा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आंदोलकांना महत्त्वाचं आवाहन केलं. तुमचं म्हणणं ऐकून घेतलं आता कार्यक्रम खराब करु नका, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विशेष म्हणजे घोषणाबाजीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपलं भाषण थांबवलं होतं. त्यानंतर फडणवीसांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं.

    आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पोलीस आंदोलकांना घेऊन जात असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं आहे. आमची अपेक्षा आहे की, त्यांनी योग्य ती कारवाई करावी”, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.

    “इतिहासाचं विकृतीकरण केलं जात आहे. रायगडावर मशीद नसताना तिथे मशीद आहे, असं सांगितलं जातंय. ते थांबवलं जावं”, असं म्हणत आंदोलकांनी आपलं म्हणणं माडलं आहे. “खालिद का शिवाजी या चित्रपटात तीन चुकीच्या गोष्टी दाखवल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35 टक्के मुस्लिम समाजाचे सैन्य होते, असा दावा चित्रपटात करण्यात आला आहे”, असं आंदोलकांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, घोषणाबाजी करणारे आंदोलक हे केवळ दोन जण होते. त्यांचा कोणत्या संघटनेशी संबंध आहे का? किंवा ते कोणत्या संघटनेचे होते? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण ते सोबत एक बॅनर घेऊन आले होते. तसेच त्यांच्या हातात निदर्शने करण्यासाठी पोस्टरदेखील होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पोलीस तपासातून आंदोलक नेमकं कोण होते? याबाबत सविस्तर माहिती समोर येऊ शकते.

    ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटात काय आहे?

    ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण या चित्रपटात एका मुस्लिम बालकाची कहाणी आहे. तो मराठी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाला जातो तेव्हा त्याला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, त्यातून त्याला काय-काय प्रश्न पडतात आणि तो आपल्या आजीला त्याबाबत प्रश्न विचारत आपल्या शंकांचं निरसन करुन घेताना चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळालं आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा