• Fri. Sep 4th, 2026

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासली जाईल – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 4, 2025
अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासली जाईल – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती – महासंवाद

नवी दिल्ली, दि. ४ : कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण  आणि  हिप्परगी बंधाऱ्यामधील बांधकामबाबतची अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून (National Dam Safety Authority) तपासली जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिष्टमंडळासह केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली.

श्रमशक्ती भवन येथे आज झालेल्या बैठकीत राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील खासदार आणि आमदार शिष्टमंडळात सहभागी होते. सेंट्रल वॉटर बोर्ड कमिशनचे अध्यक्ष, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधान सचिव देबाश्री मुखर्जी बैठकीत उपस्थित होत्या.

कर्नाटक राज्यशासनाने अलमट्टी धरणाची पूर्ण साठवण पातळी (FRL) ला 519.60 मीटरवरून 524.256 मीटर वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला असून, मात्र सध्या असणाऱ्या धरणाच्या उंचीमुळे वर्ष 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. भविष्यातही अतिवृष्टी झाल्यास या धरणाच्या बॅक वॉटरमुळे अधिक मोठे नुकसान होऊ शकते. भविष्यात होणारी आपत्ती टाळण्यासाठी आज राज्याच्या जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेत शिष्टमंडळने केंद्रीय मंत्री यांची भेट घेतली.

आज झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चेअंती केंद्रीय मंत्री श्री. पाटील यांनी राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरण यांच्याकडून कर्नाटक सरकारने अलमट्टी धरन बाधतांना केलेल्या अनियमिततेची तपासणीचे निर्देश दिले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आतापर्यंत राज्य शासनाच्यावतीने झालेल्या अभ्यासानुसार अलमट्टी धरणमुळे कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये पाणी तुंबणे वाढले आहे, त्यामुळे नदीच्या वाहून नेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. सांगली आणि कोल्हापूर येथे पूरच्या पाण्याचा ओसरण्याचा वेग कमी झाला आहे.  यामुळे लगतच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये नेहमीसाठी पूर परिस्थिती निर्माण झाली असून या परिसरातील जीवनमान बिघडले आहे. शेतीवर तसेच नागरी जीवनावर याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाच्या उंची वाढीबाबत तीव्र आक्षेप नोंदवले आहेत.

आज झालेल्या बैठकीत शिष्टमंडळामध्ये सर्वश्री खासदार श्री शाहू शहाजी छत्रपती, विशाल पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, सर्वश्री आमदार सतेज पाटील, अरुण लाड, डॉ. विश्वजीत कदम, राहुल आवाडे, राजेंद्र पाटील येड्रावकर, डॉ. अशोक कुमार माने, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, सुधाकर गाडगीळ आदी उपस्थित होते.

0000000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed