भाजपचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेसंबंधी विधान केले ज्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.
भंडारा येथील विश्राम भवनात रविवारी यानिमित्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना नेते संजय कुंभलकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत. अशा परिस्थितीत कुणीही शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये फुकेंनी शिवसेनेचे उमेदवार डॉ. प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला सहा मते देण्याचे षडयंत्र रचले. त्यामुळे शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. फुकेंनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद भाषा वापरून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्यांना आवरावे, अन्यथा शिवसेनेचा बाप कोण आहे हे आम्ही सांगू, असा इशाराही कुंभलकर यांनी दिला.
विश्राम भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने, उपप्रमुख सुरेश धुर्वे, जिल्हा उपप्रमुख विजय काटेखाये, प्रकाश मालगावे, दीपक गजभिये, मनोज साकुरे, देवराज बावनकर, बंडू हटवार आदी उपस्थित होते.
आमदार भोंडेकर यांच्या कामात फुकेंचा हस्तक्षेप
भंडारा जिल्हा नियोजन भवनात १ ऑगस्ट रोजी झालेल्या महसूल विभागाच्या बैठकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घरकुलधारकांना वाळू कधी दिली जाईल, अशी विचारणा केली. त्याचवेळी, फुके हे भोंडेकर यांना बळजबरीने अडवित होते. त्यांचा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न करत होते. आमदार भोंडेकर यांच्या मुद्द्यात फुके जबरदस्तीने हस्तक्षेप करत असल्याने त्यांनी बैठकीतून निघून जाणे पसंत केल्याचे त्यांनी सांगितले.

