पिंपरी चिंचवडमध्ये जिममध्ये व्यायाम करताना मिलिंद कुलकर्णी नावाच्या ३७ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते नियमितपणे जिममध्ये येत होते आणि त्यांना कोणताही गंभीर आजार नव्हता, अशी माहिती जिम व्यवस्थापनाने दिली.
मिलिंद कुलकर्णी नियमितपणे जिममध्ये यायचे, अशी माहिती जिमच्या व्यवस्थापकांनी दिली. मिलिंद दररोज जिमला यायचे. ते जिममधील अनुभव सदस्य होते. त्यांनी कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार नव्हता, अशी माहिती जिमच्या व्यवस्थापकांनी दिली. हृदय विकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. मिलिंद यांच्या हृदयात ६० ते ७० टक्के ब्लॉकेज होते. बहुधा याची त्यांना कल्पना नव्हती, असं डॉक्टरांनी सांगितलं. यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयातच मिलिंद कुलकर्णी यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. मिलिंद यांची पत्नी पेशानं डॉक्टर आहे.
जनभावनेची जाणीव, मठाशी संवाद अन् माधुरीचं कल्याण; हत्तीणीबद्दल ‘वनतारा’चं स्पष्टीकरण
मिलिंद कुलकर्णी यांचे अखेरचे क्षण जिममधील सीसीटीव्हीत कैद झाले. मिलिंद कुलकर्णी व्यायाम करताना ब्रेक घेऊन कूलरजवळ पाणी प्यायला गेले. यानंतर काही सेकंदात ते तिथे कोसळले. मिलिंद जमिनीवर कोसळल्याचं तिथे असलेल्या एक, दोन जणांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीनं ही बाब इतरांच्या लक्षात आणून दिली. यानंतर जिममधील जवळपास सगळेच जण तिथे जमले. त्यांनी मिलिंद यांना उचललं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण मिलिंद यांचा जीव वाचू शकला नाही. मिलिंद यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी मिलिंद यांच्या कुटुंबियांनी कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

