Divya Deshmukh : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावून ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आज नागपुरात दाखल झाली. यावेळी नागपूर विमानतळावर तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. दिव्याच्या स्वागतासाठी नागपूरकरांनी नागपूर विमानतळाबाहेर मोठी गर्दी केलेली होती. नागपूरकरांनी केलेलं स्वागत पाहून दिव्या देखील भारावली.
जॉर्जियात स्पर्धा खेळून मुंबई मार्गे रात्री उशिरा नागपुरात दाखल झालेल्या आपल्या या नव्या ‘वर्ल्ड चॅम्पियन’चे नागपूरकरांनी जंगी स्वागत केले. रात्री सव्वानऊच्या सुमारास दिव्याचे आगमन होणार होते. मात्र, तासभर आधीपासूनच विमानतळावर तिच्या स्वागताची जय्यत तयारी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, नागपूर चेस असोसिएशन आणि इतर संघटनांनी करून ठेवली होती. आई डॉ. नम्रता देशमुख यांच्यासह दिव्या विमानतळाच्या बाहेर येताच उपस्थित सर्वांनी एकच जल्लोष केला.
बाहेर पडताच दिव्याने सर्वप्रथम वडील डॉ. जितेंद्र देशमुख यांना कडकडून मिठी मारली. तर आजीच्या पाया पडत आशीर्वाद घेतला. वर्ल्ड चॅम्पियन दिव्याला बघताच कुटुंबातील सर्व सदस्य भावूक झाले होते. तिच्या स्वागतासाठी लहान मुलांसह त्यांचे पालक, बुद्धिबळप्रेमी यांनी हातात बॅनर, दिव्याचे अभिनंदन करणारे फलक घेऊन तिचे स्वागत केले. ढोलताशे व घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून गेला होता. लॉबी मध्ये येताच दिव्याला ‘टिआरा’ घालण्यात आला.
विमानतळावर झालेली गर्दी बघता पोलिसांना दिव्याला तिच्या मिरवणूकीसाठी ठेवण्यात आलेल्या जीपपर्यंत पोहचवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. यावेळी वडील डॉ. जितेंद्र यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. विमानतळावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार परिणय फुके, नागपूर चेस असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश व्यास, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, महापालिकेचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
‘माझ्यासाठी भावूक क्षण’
“हे यश माझ्यासाठी पहिले पाऊल आहे. खेळातील उणिवा दूर करून आणखी चांगली कामगिरी करता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्या शहरवासीयांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत हा खूप भावनिक क्षण आहे. यामुळे पुढे आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल”, अशी प्रतिक्रिया दिव्याने व्यक्त केली.

