राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शह देण्यासाठी भाजपने मोठी खेळी खेळली आहे. माजी राज्यमंत्री अण्णासाहेब डांगे यांनी वयाच्या नव्वदीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं १३२ जागा जिंकत इतिहास रचला. आता २०२९ साठी भाजपनं शतप्रतिशतचा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपनं पक्ष प्रवेशांचा अक्षरश: सपाटा लावला आहे. काँग्रेसच्या अनेक माजी आमदारांना भाजपनं पक्षात घेतलं आहे. यानंतर आता सांगलीतील प्रमुख धनगर नेते असलेल्या अण्णासाहेब डांगे यांना भाजपनं सोबत घेतलं आहे. विशेष म्हणजे डांगे मूळचे संघ परिवारातील नेते आहेत.
१९९५ मध्ये काँग्रेसला राज्यात सत्तेपासून पहिल्यांदा दूर राखण्यात डांगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांना मंत्रिपदही देण्यात आलं. पण २००३ मध्ये त्यांनी भाजपची साथ सोडत राजकीय संन्यास घेतला. पण पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सोहळ्याला शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी डांगे यांनी ‘शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात..’ या गाजलेल्या मराठी गाण्याच्या ओळी उद्धृत केल्या होत्या. पण आता डांगे यांनी पुन्हा घरट्यासाठी अंगण बदललं आहे. त्यांच्या सोबत त्यांच्या दोन्ही लेकांनीदेखील कमळ हाती घेतलं गेलं आहे.
राज्यातील भाजपची सत्ता गेल्यावर डांगे यांनी भाजपची साथ सोडली. पक्ष नेतृत्त्वाशी मतभेद झाल्यानं नाराजी व्यक्त करत डांगे यांनी पक्षाला रामराम केला होता. भाजपनं डांगे यांना मोठं केलं आणि डांगे यांनीही पक्षासाठी तळागाळात काम केलं. डांगे यांनी पक्ष सोडला, तेव्हा पक्षात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचं युग सुरु होतं. २०१४ मध्ये राज्यात आणि केंद्रात भाजपचं सत्ता येऊनही डांगे राष्ट्रवादीतच राहिले. पण आता त्यांनी वयाच्या नव्वदीत घरवापसी करत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

