Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आजोबांच्या निधनाचं दु:ख सहन न झाल्याने नातीचा देखील हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे नातीचा 4 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ नागरिक नरसिंग हनुवंता गायकवाड असे निधन झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. तर पुनम (उर्फ छकुली) विक्रम तुपे (वय १९) असे मयत झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आळंदी येथे राहणारे नरसिंग गायकवाड यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. या घटनेमुळे सर्व नातेवाईक आळंदी येथे आले. आजोबांचे निधन झाल्यामुळे नवविवाहित पूनम देखील आळंदी येथे आली. घरातील ज्येष्ठ नागरिक गेल्याने नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता.
याचवेळी पूनमच्या छातीत त्रास होऊ लागला. यामुळे पूनमला तात्काळ आळंदी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पूनमच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दरम्यान उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी पूनमने प्राण सोडले. अगोदरच कुटुंबात घरातील जेष्ठ नागरिक गेले. त्या पाठोपाठ नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबियांनी रुग्णालयातच टाहो फोडला.
4 महिन्यांपूर्वी झाला होता पूनमचा विवाह
दरम्यान, या घटनेमध्ये मयत झालेल्या पूनमचा चार महिन्यांपूर्वी शेवता या गावातील विक्रम तुपे यांच्याशी विवाह झाला होता. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. शोकाकुल वातावरणात पूनमच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

