• Thu. Mar 12th, 2026
    कल्याण मारहाण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट; महिलेच्या कानाखाली का मारली? पीडिता म्हणाली…

    Kalyan Hospital Receptionist Girl Assault : कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला परप्रांतीय तरुणाने मारहाण केल्याने वाद निर्माण झाला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडितेची भेट घेऊन तिला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणातला नवा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत पीडिता आरोपीच्या भावजयीला कानाखाली मारताना दिसत आहे. त्यामुळे आता प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या नव्या व्हिडीओवर पीडितेने प्रतिक्रिया दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    ठाणे : कल्याणच्या नांदिवली येथील एका खासगी रुग्णालयातील रिस्पेशनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने मारहाण केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी कल्याणला जावून पीडित तरुणीची भेट घेतली आहे. त्यांनी पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच पीडितेचा रुग्णालयाता सर्व खर्च मनसे करणार आहे. या प्रकरणात दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. पहिल्या दिवशी आरोपी गोकुळ झा हा रिस्पेप्शनिस्ट तरुणीला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. त्याच व्हिडीओवरुन मोठा वाद झाला होता. यानंतर आज दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पीडिता आरोपी तरुणीच्या भावजयीच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर आता रुग्णालयात दाखल असलेल्या पीडितेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    “मला त्याच व्हिडीओवर स्पष्टीकरण द्यायचं आहे. तो जो आरोपी आहे, त्याच्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं आहे. मला आतून सरांचा आदेश आला होता की, मॅडम पेशंट आतमध्ये पाठवू नका. पेशंट थांबवा. मी वारंवार आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न करत होती की, थांबा. तुमचा नंबर नाही. मला सरांनी तिकडून पेशंट न पाठवण्याचा आदेश दिला आहे. तरी तो सारखा घाई करत होता. त्याने मला एवढ्या घाण शिव्या घातल्या आहेत की मी त्या सांगूही शकत नाही”, असं पीडिता म्हणाली.

    ‘माझ्या संरक्षणासाठी मी एवढं सुद्धा करु शकत नाही का? ‘

    “ज्याप्रकारे तो माझ्या अंगावर धावत आला, त्याने मला मारलंसुद्धा. त्याने माझ्या मानेवर लाथ मारली. हेच मी त्याच्या नातेवाईकांना सांगायला गेली की हे तुम्ही बघत कसे उभे राहिले? हे सांगत असताना मी त्याच्या भावजयीला मारलं. माझ्या संरक्षणासाठी मी तेवढं सुद्धा नाही करु शकत का? तो मला एवढ्या घाण परिस्थितीत मारत होता की हे सर्व बघत उभे राहिले होते. माझ्या संरक्षणासाठी मी एवढं सुद्धा करु शकत नाही का? त्याचवेळी माझं काही झालं असतं तर कोणी जबाबदारी घेतली असती?”, असा सवाल पीडित मुलीने केला.

    “त्याने अगोदर माझ्या मानेवर लाथ मारली ते व्हिडीओत आलं आहे की नाही ते मी एवढं बघितलं नाही. पण त्याने एवढ्या जोरात मारलं की माझी उठायची देखील अवस्था नव्हती”, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीने केली. दरम्यान, आज समोर आलेल्या व्हिडीओनंतर काही जणांकडून मुलीवरही टीका केली जात आहे. तसेच मुलीवरही गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. त्यावर मनसे महिला सेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. पीडितेने स्वत:च्या संरक्षणासाठी महिलेला मारहाण केली, असं मनसे महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा