• Fri. Sep 4th, 2026

Jawan Rohit Patil : लहान चिमुकल्याने दिला वडिलांना अग्नीडाग, हजारोंच्या जनसमुदायाचा साश्रुनयनांनी वीर जवानाला अखेरचा निरोप

वीर जवान रोहित पाटील यांना हजारोंच्या जनसमुदायाने साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. देशसेवा करत असताना जवान रोहित पाटील यांना वीरमरण आले. जळगावच्या कोळपिंप्री गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात रोहित पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जळगाव : जळगावच्या पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील 1 पॅरा स्पेशल फोर्सचे पॅरा कमांडो जवान रोहित नारायण पाटील (काटे) यांना कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झाले. देशसेवेत तब्बल नऊ वर्षे समर्पित सेवा बजावणाऱ्या या वीर जवानाचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी कोळपिंप्रीसह पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने नागरिकांचा जनसागर उसळला होता. रात्री आठ वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरियाणा राज्यातील यमुनानगर येथील हथिनीकुंड बॅरेज येथे लष्कराच्या पूर-बचाव प्रशिक्षणादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. प्रशिक्षण सुरू असताना मोटरबोटीच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने बोट उलटली. या दुर्घटनेत जवान रोहित काटे यांना वीरमरण आले. गुरुवारी त्यांच्या निधनाची वार्ता कोळपिंप्री गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले.

300 फूट तिरंग्यासह निघाली वीर जवानाची अंत्ययात्रा

सायंकाळी साडेपाच वाजता रोहित काटे यांचे पार्थिव कोळपिंप्री गावात दाखल झाले. पार्थिवाचे दर्शन होताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. गावकऱ्यांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात आपल्या वीर सुपुत्राचे स्वागत केले. तब्बल ३०० फूट लांबीचा तिरंगा फडकावत, देशभक्तीपर गीतांच्या निनादात त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. गावातील प्रत्येक गल्लीमध्ये नागरिकांनी रांगोळ्या काढून वीर जवानाला आदरांजली वाहिली होती. ‘वीर जवान अमर रहे!’, ‘रोहित काटे अमर रहे!’, ‘भारत माता की जय!’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

शासकीय इतमामात लष्करी मानवंदना

अंत्यसंस्कारस्थळी भारतीय सैन्य दलातील जवानांनी शासकीय इतमामात रोहित काटे यांना मानवंदना दिली. लष्करी जवानांच्या शिस्तबद्ध सलामीने उपस्थितांचे मन हेलावून गेले. विविध मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी पुष्प अर्पण करून वीर जवानाला श्रद्धांजली वाहिली.

रात्री आठ वाजता पुतणे तसेच त्यांचा मुलगा हर्षदीप यांच्या हस्ते जवान रोहित काटे यांच्या पार्थिवाला अग्निडाग देण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी आपल्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला.

पालकमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

जवान रोहित काटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, डीवायएसपी विनायक कोते, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, पारोळ्याचे तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक दीपक पाटील, माजी सैनिक निलेश पाटील यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या सीमांचे रक्षण करताना तसेच प्रशिक्षणादरम्यान कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या जवान रोहित काटे यांच्या बलिदानाने कोळपिंप्री गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या शौर्याला आणि देशसेवेतील योगदानाला संपूर्ण परिसरातून आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले. ‘शहीद जवान रोहित काटे अमर रहे!’च्या घोषणांनी कोळपिंप्रीच्या भूमीत वीर जवानाची अखेरची यात्रा भावपूर्ण वातावरणात पूर्ण झाली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा