पुण्यात एका क्लास वन अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या घरात आणि बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे लावून तिचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ बनवले. त्याने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून गाडी आणि घराच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. पीडित पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
क्लास वन अधिकारी स्तरावरचा अधिकारी हा संवेदनशील असावा, अशी भावना असते. कारण क्लास वन अधिकारी बनण्यासाठी खूप शिक्षण, खूप मेहनत करावी लागते. या संघर्षात व्यक्ती माणूस म्हणून प्रगल्भ होतो. पण या घटनेतील क्लास वन असलेल्या व्यक्तीमध्ये बुद्धी आणि संवेदनशीलेतचा अभाव दिसत आहे. त्याने आपल्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले आणि पैशांसाठी ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
या प्रकरणातील पीडित महिलेचं 2020 मध्ये आरोपी पतीसोबत लग्न झालं होतं. आरोपी पती लग्न झाल्यापासून सातत्याने महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. आरोपी पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून तो पीडितेला अर्वाच्य शिवीगाळ, मारहाण करायचा. तसेच मानसिक त्रासही द्यायचा.
आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या क्लास वन अधिकारी असलेल्या पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी घरात स्पाय कॅमेरे लावले. तो त्या माध्यमातून पत्नीवर पाळत ठेवायचा. त्याने घरातल्या बाथरुममध्ये देखील स्पाय कॅमेरे बसवले होते. आरोपी पतीने पीडितेचे आंघोळ करतानाचे आणि इतर खाजगी क्षणांचे व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. त्याने ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माहेरून गाडी आणि घराच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपये आणण्याची मागणी केली.
अखेर पीडितेने हा सगळा त्रास असह्य झाल्याने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या घटनेती गंभीरपणे दखल घेतली आहे. या घटनेप्रकरणी पीडितेच्या पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस काय तपास करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. पीडित क्लास वन अधिकारी असलेल्या महिलेला न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

