Devendra Fadnavis on Honey Trap : राज्यात हनीट्रॅप प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा यांना अटक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हनीट्रॅप प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“पहिली गोष्ट म्हणजे हा जो लोढा आहे त्याचे सर्वांसोबत फोटो आहेत. शरद पवार यांच्यासोबतही फोटो आहे. सगळ्यांसोबतच फोटो आहेत. या असल्या फोटोंनी काही होत नाहीत. आताच्या परिस्थितीत कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत. नुसतं बोलत राहायचं, पुरावे न देता बोलत राहायचं आणि वायफळ चर्चा करायची. अशा वायफळ चर्चांना उत्तर द्यायला मला थोडी वेळ आहे. मी देखील विरोधी पक्षात होतो. जेव्हा आरोप केला तेव्हा पुरावा दाखवला. एकही आरोप परत घ्यावा लागला नाही. एकही आरोप खोटा ठरला नाही. याला विरोधी पक्ष म्हणतात”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या आरोपांना गिरीश महाजन यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर टीका केली. तसेच प्रफुल्ल लोढा हा सर्वपक्षीय कार्यकर्ता असून त्याचे सर्व नेत्यांसोबत फोटो असल्याची माहिती महाजनांनी दिली. यावेळी त्यांनी लोढा याचे ज्येष्ठ नेत शरद पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतचे फोटो दाखवले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना मुंबई हायकोर्टाने दोषमुक्त ठरवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हायकोर्टाच्या निकालावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. “आपल्या सगळ्यांसाठी हा निर्णय धक्कादायक आहे. याचं कारण म्हणजे खालच्या कोर्टाने निर्णय दिला होता. 2006 मध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर एटीएसने आरोपी पकडले होते. पुरावे जमा केले होते. कोर्टासमोर सादर केले होते. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय येणं हे धक्कादायक आहे. मी अजून निर्णय वाचलेला नाही. पण मी तात्काळ वकिलांशी चर्चा केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, आपण सुप्रीम कोर्टमध्ये हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं पाहिजे. आम्ही लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाऊन या निर्णयाला आव्हान देऊ”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

