Girish Mahajan : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मोठे भाकीत केले आहे. विरोधी पक्षातील अनेक खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच ते आमच्या पक्षात प्रवेश करतील, विशेषत: उबाठा गटातील खासदारांचा यात समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड आता संपला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
“महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड कधीच संपला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. त्यावेळेसचा विषय वेगळा होता. उद्धव ठाकरे 2019 ला काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. त्याचवेळी ठाकरे ब्रँड संपला”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
“शिंदे सरकार कोणत्या सीडीमुळे आले. याचा खुलासा झाला पाहिजे. उगाच हवेत गोळीबार करतात. नाशिकची सीडी सांगतात, काँग्रेस नेते नाना पटोले सीडी, पेन ड्राईव्ह दाखवतात. तो दाखवण्यापेक्षा तो अध्यक्षांना दिला पाहिजे. कोणी कधीही उठायचं आणि काहीही सांगायचं, याचा काय उपयोग आहे? जर तुमच्याकडे पुरावा असेल तर ते दाखवला पाहिजे, असं गिरीश महाजन म्हणाले.
“आमच्याकडे खासदारांची संख्या अजून वाढेल. आधीच चार खासदार संपर्कात होते. त्यात अजून तीन खासदारांची वाढ होईल. हे खासदार सर्व पक्षातील आहेत. त्याचबरोबर उबाठा गटातील जास्त खासदार संपर्कात आहेत”, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. यावेळी गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली. “विधानसभेच्या काळात दोन नेते एकत्र आले, भेटले, हास्यविनोद झाला, तेवढंच झालं आणि ते असलं पाहिजे ना? नुसतं एकमेकांकडे रागात पाहण्याची किंवा वाईट टिप्पणी करायची गरज नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका
खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीवरही प्रतिक्रिया दिली. “त्या मुलाखतीबद्दल काय बोलावं ते मलाचं समजत नाही. दरवर्षी दोघं मुलाखती घेतात, ठरवून घेतात की, प्रश्न पत्रिका काय, उत्तरपत्रिका काय, आणि प्रश्न-उत्तर करत असतात, सर्व हसत आहेत त्याला, कुणी दुसऱ्याने मुलाखत घेतली तर वेगळा विषय आहे. मी यावर जास्त बोलणार नाही. पण मला असं वाटतं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी दोघांची एकमेकांची मुलाखत घ्यायची. हा काय विषय होऊ शकतो का? तुम्हीच प्रश्न विचारायचे, तुम्हीच उत्तर ठरवायचं. बघायचं कोणी? लोकं गंमतीने बघतात”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.
खासदारांचा पक्षप्रवेश का रखडला?
“विरोधी पक्षातील काही खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या संख्येत अजून वाढ होत आहे. आधी 4 होते, आणखी दोन ते तीन वाढत आहेत. विरोधी पक्षातले आहेत, पण उबाठातले जास्त आहेत. पण आता काही कायदेशीर तांत्रिक अडचण आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश होऊ शकत नाही”, असंदेखील भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं.

