Uddhav Thackeray Saamana Interview : उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधील मुलाखतीत शिंदे गटावर निशाणा साधला. शिंदे गटाला विधानसभा निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागांवर यश मिळालं. याबाबत संजय राऊत यांनी प्रश्न विचारला असता, ‘कदाचित त्यांनी डायनासोर कापला असेल’ अशी मिश्किल प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच सध्याच्या घडामोडी पाहता राजकारणाचा उबग येतो का? या प्रश्नावर, ‘राजकारण्यांचा येतो’ असे उत्तर त्यांनी दिले. सत्ताधारी राजकारण्यांना फोडून सत्तेच्या शीतकपाटात ठेवतात, अशी टीकाही त्यांनी केली.
“पहिली गोष्ट एक सांगतो, या जादूटोण्यावर माझा विश्वास नाही. या भाकडकथा आहेत. त्यातून एकच आहे की, त्यातून त्यांची मानसिकता कळते. दुसऱ्याचं वाईट व्हावं, हे त्यांचं त्या कृत्यातून कळतं. म्हणजे त्यांनी रेडा कापला असेल तर रेड्याचा जीव नाहक गेला. रेड्यामुळे काही घडतंय असा माझा अजिबात असा माझा अजिबात विश्वास नाही. पण त्या कृतीतून त्यांच्या मनातील काळंबेर आहे हे लोकांच्या समोर येतं. म्हणून त्याला काळी विद्या म्हणतात. कारण त्यांचं काळंबेर हे लोकांसमोर येतं. पण माझं या भाकडकथांवर अजिबात विश्वास नाही”, अशी रोखठोक भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
या राजकारणाचा उबग येतो का?
तुमची लोकं निघून जात होती. त्यांचे 24 तासात मतपरिवर्तन झालं. ते मोहाला बळी पडून निघून जातात. ते पाहिल्यावर राजकारणाचा उबग येतो का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर त्यांनी “राजकारणाचा उबग म्हणण्यापेक्षा राजकारण्यांचा येतो. कारण हे राजकारण नाही. मी हे राजकारण म्हणू शकत नाही. जसं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, हे गजकरण आहे. ही सत्तेची खाज आहे. ही एवढी सुटते जेवढी खाजवाल तेवढी सुटते. त्यामुळे हे राजकारण नाही तर गजकरण आहे. त्यांना सत्ता मिळाली आहे ना, केंद्रात मिळाली आहे, राज्यात मिळाली आहे. तरीही तु्म्हाला सोसायटी निवडणुकीतही माझाच माणूस पाहिजे. दूध संघ असला तरी माझंच पाहिजे. हे सत्तेचं गजकरण आहे. त्यांना सत्तेच गजकरण झालं आहे. याला राजकारण म्हणत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘हे राजकारण्यांना फोडतात आणि आपल्या सत्तेच्या शीतकपाटात ठेवतात’
“जंगली प्राणी म्हणजे हिंस्त्र नाही. हिंस्त्र हे राजकारणी असतात. जंगली प्राणी नाही. जंगलात कारण नसताना कोणी कुणावर हल्ला करत नाही. अगदी वाघ, सिंह देखील त्यांना भूक लागल्याशिवाय शिकार करत नाहीत. तो शेवटी निसर्ग नियम आहे. अन्यथा ते सुद्धा भाजीपाला खावून जगले असते. जसा हत्ती जगतो. किंवा इतर सुद्धा प्राणी आहेत. वाघ हा भूकेपुरता शिकार करतो. तो प्राणी मारुन फ्रिजमध्ये ठेवत नाही. सत्ता मिळाली तरी आणखी आमदार घ्या, असं वाघ किंवा सिंह करत नाहीत. आता हरिण मारलं उद्यासाठी आणखी एक मारु. कारण त्यांच्याकडे फ्रिज नाही. हे काय करतात? हे राजकारण्यांना फोडतात आणि आपल्या सत्तेच्या शीतकपाटात ठेवून देतात. थंड करुन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

