• Sat. Mar 7th, 2026

    “ते स्वत: जादूटोणा करतात, ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू मिळाले”, रामदास कदम यांचा दावा

    “ते स्वत: जादूटोणा करतात, ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू मिळाले”, रामदास कदम यांचा दावा

    Ramdas Kadam : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच काळीजादूचा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली तेव्हा जादूटोणाबाबत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. त्यावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. रामदास कदम यांनी पलटवार करताना उद्धव ठाकरे यांच्यावरच जादूटोण्याचा आरोप केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांवर वारंवार जादूटोण्याचा आरोप केला जातोय. एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्यावर विरोधकांकडून जादूटोणाचे आरोप करण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या 50 पेक्षा जास्त जागा विधानसभेत जिंकून आल्या. हा जादूटोणा होता का? असा प्रश्न संजय राऊतांनी ठाकरेंना विचारला. त्यावर ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला. याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.

    “ज्यांना कावीळ होतो त्यांना सर्व दुनिया पिवळी दिसते. आता ते मातोश्रीमध्ये बसून जादूटोणाच करत असतील. ते तसंच दिसणार. ते जेव्हा वर्षा बंगला सोडून गेले तेव्हा वर्षा बंगल्यावर टोपलीभर लिंबू मिळाले. ही लिंब कधी मिळतात? जादूटोण्याचाच तो भाग आहे. स्वत: जादूटोणा करतात म्हणून एकनाथ शिंदे यांना बदनाम करतात”, असा मोठा दावा रामदास कदम यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत केला आहे.

    ठाकरे ब्रँडवर रामदास कदम यांची टीका

    उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत ठाकरे ब्रँड हा हिंदू अस्मितेची ओळख आहे, असं म्हटलं आहे. त्यावरही रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली. “काँग्रेस, सोनिया गांधी सोबत गेल्यानंतर हा ठाकरे ब्रँड कसा होऊ शकतो? शरद पवारांसोबत ठाकरे ब्रँड कसा असू शकतो? शिवसेनाप्रमुख जोपर्यंत होते तोपर्यंत ठाकरे ब्रँड होता. तो हिंदुत्वाचा ब्रँड होता. पण हिंदूत्व सोनिया गांधींच्या पायाशी गहाण ठेवल्यानंतर आता ठाकरे ब्रँडचा प्रश्न येतो कुठे? लोकांची दिशाभूल करत आहेत, चुकीचं बोलत आहेत. लोकं फसरणार नाहीत. लोकांना उद्धव ठाकरेंची खरी ओळख झालेली आहे”, अशी टीका रामदास आठवले यांनी केली.

    वडेट्टीवार यांच्या दाव्यावर रामदास कदमांची प्रतिक्रिया

    हनीट्रॅपच्या प्रकरणामुळे शिंदेंचं सरकार आलं होतं, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली. “काहीतरी हवेत तलवार चालण्यापेक्षा तुमच्याकडे काही पुरावा असेल तर द्याना. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. पुरावे द्या आणि मग बोला ना. फक्त एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा तुमचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे. तुमच्या हातात काही असेल तर द्या. वडेट्टीवार माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना वेगळा शब्द वापरत नाही. माझा त्यांना मित्र म्हणून सल्ला आहे, आपण विरोधी पक्षनेता होता. आपण पुरावे दिले पाहिजेत मग बोललं पाहिजे. असं हवेत बोलून चालतं का?”, असा सवाल रामदास कदम यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा