• Mon. Mar 16th, 2026

    ‘त्या धोंड्याने हे बेकायदेशीर केलं’, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा

    ‘त्या धोंड्याने हे बेकायदेशीर केलं’, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा

    Uddhav Thackeray Interview : संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी निवडणूक आयुक्तांवर ‘धोंड्या’ म्हणून टीका केली. एकनाथ शिंदे भाजपात विलीन होतील, असा दावाही त्यांनी केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार तथा ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर याआधीच प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे या मुलाखतीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित झाला आहे. जवळपास ४५ मिनिटांचा हा पहिला भाग आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. पण पक्षांचं नाव दुसऱ्याला देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही, असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं आहे. उद्धव ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना धोंड्या असं नाव ठेवलं तर चालेल का? असा प्रश्न केला आहे. यानंतर ते आपल्या पुढच्या प्रतिक्रियेत निवडणूक आयोगाच्या आयचक्तांना धोंड्या असंच म्हणताना दिसत आहेत.

    एकनाथ शिंदे आपली शिवसेना भाजपात विलीन करतील का? असा पहिला प्रश्न संजय राऊत उद्वव ठाकरे यांना विचारतात. त्यावर ठाकरे शिंदेंवर निशाणा साधतात. “त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय? त्यांच्या गुरुपौर्णिमेचं संपूर्ण वर्णन आपण केलंत. आपण केलेल्या वर्णनाचं संपूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं की, तिकडे काय-काय झालं, असे जे असतात, ते परावलंबित असतात”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

    “शिवसेनेचं ते अस्तित्व संपवू शकत नाहीत. इतके वर्ष होऊनही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकले नाहीत. हेच तर त्यांचं दु:ख आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे शेवटचा पर्याय तोच आहे, जो त्यांचा पहिला पर्याय होता. घालीन लोटांगण वंदीन चरण करायचं. कारण दुसरा पर्यायच नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर निशाणा

    यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. “निवडणूक आयोग कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे दुसऱ्याला देऊ शकेल किंवा गोठवू शकेल. पण शिवसेनेचं नाव दुसऱ्या देऊ शकत नाही. तो निवडणूक आयोगाला अधिकारच नाही. कारण शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी ठेवलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्तांचं नाव बदलून धोंड्या ठेवलं तर काय होईल? माझं नाव बदलल्यानंतर मी त्याला धोंड्याच म्हणेन. त्या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. तुम्ही चिन्ह काढू शकता. जर लोकशाही पद्धतीने आम्ही काही वेडंवाकडं वागलो असेल तर चिन्हं काढू शकता. संविधानानुसार आम्ही चूक केली नसेल चिन्हं देखील काढू शकत नाही. मतांची टक्केवारी वगैरे विषय असेल तो चिन्हापुरता आहे. पण नाव काढू शकत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    “त्या धोंड्याने हे बेकायदेशीर केलं आहे. त्या धोंड्याने शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना, हे त्याच्या अधिकाराच्या बाहेरचं आहे. त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसले आहेत म्हणून चालतंय. पण लोकं त्याचं ऐकणार नाहीत. शेवटी चोरीचा माल आहे. तुम्ही चोरी केली आहे आणि त्यावर मर्दुमकी दाखवत असाल तरी चोर तो चोरच आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा