• Sun. Jun 7th, 2026
    पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ स्टाइल हत्येनं खळबळ; 25 वर्षीय तरुणाला संपवलं, कोयता काढला अन्…

    Pune News Today: पुण्यात कात्रज परिसरात एका पानटपरीवर किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका 25 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी धैर्यशील मोरे याला अटक केली आहे. आर्यन साळवे असे मृत तरुणाचे नाव असून तो नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी होता आणि नोकरीसाठी पुण्यात आला होता.

    पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ स्टाइल हत्या; 25 वर्षीय तरुणाला संपवलं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे: पुणे शहरात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. किरकोळ कारणांतून झालेल्या वादानंतर थेट हत्या करण्यापर्यंत तरुणांची मजल जात आहे. अशीच आणखी एक घटना शहरात घडली असून एका पानटपरीवर किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर एका 25 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना कात्रजमधील साई सिद्धी चौकात घडली. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी धैर्यशील मोरे याला अटक केली आहे.

    आर्यन साळवे (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील होता. सध्या तो आंबेगाव पठार, धनकवडी येथे मामांकडे राहत होता. काही दिवसांपूर्वीच तो पुण्यात नोकरीसाठी आला होता. तो एका केशकर्तनालयात काम करत होता. अटक केलेल्या आरोपीचे नाव धैर्यशील मोरे (वय 30) आहे. तो साई सिद्धी चौकातच राहतो.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आर्यन पानटपरीवर पान खाण्यासाठी गेला होता. तिथे धैर्यशील सिगारेट ओढत उभा होता. धैर्यशीलने आर्यनकडे ‘खोडसाळ नजरेने’ पाहिल्याचा आरोप करत दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात धैर्यशीलने कोयत्याने आर्यनवर वार केले. आर्यनने हात पुढे करून बचाव करण्याचा प्रयत्न केला. यात त्याची बोटे तुटली. डोक्यावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

    पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे म्हणाले, “हा खून अचानक झालेल्या किरकोळ वादातून झाला आहे. यामागे काही पूर्ववैमनस्य होतं का, याचा तपास सुरू आहे.”

    दरम्यान, या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी धैर्यशील मोरे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत असून पुढील चौकशी सुरू आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा