• Wed. Mar 11th, 2026

    ‘तुमच्या बापाने ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला…’, लक्ष्मण हाके यांची प्रणिती शिंदे यांच्यावर जळजळीत टीका

    ‘तुमच्या बापाने ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला…’, लक्ष्मण हाके यांची प्रणिती शिंदे यांच्यावर जळजळीत टीका

    Laxman Hake Slams Praniti Shinde : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतरवली सराटी गावात जावून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केला आहे. लक्ष्मण हाके यांनी प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर आता प्रणिती शिंदे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    जालना : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेला मोर्चा काढणार आहेत. मनोज जरांगे पाटील सध्या जालनातील अंतरवली सराटी गावात मोर्चाचं नियोजन करत आहेत. यावेळी आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. मनोज जरांगे यांनी आपल्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदार आणि खासदारांना अंतरवली सराटी गावात येण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिसाद दिला. प्रणिती शिंदे यांनी अंतरवली सराटीत जावून मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी प्रणिती शिंदे यांचं स्वागत केलं. प्रणिती शिंदे आणि मनोज जरांगे यांच्या भेटीलर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जळजळीत टीका केली आहे.

    “जरांगेची भेट घेण्यापूर्वी त्यांची मागणी काय याची माहिती तुम्हाला असतानाही तुम्ही भेटलात. तुमच्या बापाने 2004-05 दरम्यान एक परिपत्रक काढून कुणबी मराठा आणि मराठा कुणबी एकच समजावेत असा आदेश काढला होता. त्यामुळे ओबीसी उद्ध्वस्त झाला. आता तुम्ही बापाच्या पावलावर पाऊल ठेवत जरांगेला भेटायला गेलात”, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. “प्रणिती शिंदे राजकारण करत आहेत. खासदारकी भोगत आहेत. पण ते सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्या भटक्या विमुक्त जातीच्या जीवावर, त्यांच्या बापाने काढलेल्या एका जआर मुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त झाली होती”, अशीदेखील टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

    Laxman Hake on Ajit Pawar | ‘आम्हाला भटके कुत्रे म्हणता’, लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांचं सगळंच काढलं

    “तुमच्या बापाने ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला आणि तुम्ही त्याच बापाच्या पावलावर पाऊल ठेवत जातीयवादी मनोज जरांगे याला भेटायला गेलात. जरांगेच्या मागणीनुसार जर त्याच्या जातीला ओबीसीमधून आरक्षण दिले तर मूळ मागास असलेला गोरगरीब, ओबीसी समाज त्याच्या समाजाच्या स्पर्धेत टिकेल का? याची जाणीव तुम्हाला असायला हवी होती. पण, याचा विचार ना तुमच्या बापाने केला, ना तुम्ही करताय. जरांगेला भेटण्यापूर्वी जिल्ह्यातील गोरगरीब ओबीसी समाजाचा विचार तुम्ही करायला हवा होता. मात्र, ओबीसी मरो आणि तुमचे राजकारण जगो ही तुमची वृत्ती असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार”, असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा