Nagpur Crime News : नागपूरमध्ये बॉम्बे हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती विजय डागा यांना सायबर ठगांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवण्याचा प्रयत्न केला. पोलीस गणवेशातील व्यक्तीने आधार कार्ड वापरून गुन्हा केल्याचा आरोप करत दोन कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. न्यायमूर्ती डागा यांनी सतर्कता दाखवत सायबर सेलला माहिती दिली, ज्यामुळे फसवणूक उघडकीस आली. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
न्यायमूर्ती डागा यांनी पैसे परत देण्यास नकार दिल्यानंतर, कॉल एका महिलेकडे ट्रान्सफर करण्यात आला. त्या महिलेने स्वतःला वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून धमकी दिली की, 2 कोटी रुपये दुपारी अडीच वाजेपर्यंत दिले नाहीत, तर न्यायमूर्ती डागा यांना जामीन न मिळता थेट तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल.
मात्र, माजी न्यायमूर्ती विजय डागा यांनी अतिशय प्रसंगावधान राखत त्वरित सायबर सेल तसेच उच्च न्यायालयाच्या प्रोटोकॉल अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. नागपूर पोलिसांनी तपास केल्यानंतर हा प्रकार संपूर्णपणे फसवणुकीचा असल्याचे निष्पन्न झाले. सुमारे 90 मिनिटे चाललेल्या या व्हिडिओ कॉलचे लोकेशन राजस्थान-गुजरात सीमेवर ट्रेस झाले आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, सायबर ठगांच्या कारवायांचा स्कोप किती भयानक पातळीवर पोहोचला आहे. देशातील वरिष्ठ न्यायमूर्ती, ज्यांनी न्यायव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे, त्यांनाही या शिताफीने फसविण्याच्या प्रयत्नातून वाचावे लागत आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा कॉल्सपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही माहिती किंवा पैसे देण्यापूर्वी खात्री करण्याचे आवर्जून सांगितले आहे. नागपूर पोलिसांकडून या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.

