Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांचा कथित पैशांच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात बोलताना शिरसाट यांनी मिश्किल टिप्पणी केली. ‘पैशांची चिंता करू नका, गरज पडल्यास बॅग पाठवून देऊ’, असे ते म्हणाले. रुग्णांना दिलासा देणे महत्त्वाचे असून, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले पाहिजे, असेही शिरसाट यांनी नमूद केले.
“रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर आपण त्याच्यासोबत चांगल्याप्रकारे वर्तवणूक केली, त्याला स्मितहास्य दाखवत त्याच्याशी बातचित केली तर त्यालादेखील बरं वाटेल. तुला काही होणार नाही, असा शब्द तुमच्या मुखातून निघाला तर त्याच्यासाठी तो देवाच्या मुखातून आलेला शब्द असेल, त्याला समाधान वाटेल. त्याचा परिमाण बघा काय होतो. आपल्याला माहिती आहे, कॅन्सरच्या आजारावर ठोस एकही औषध नाही. आपण फक्त उपचार करु शकतो. आता संशोधनातून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यामुळे काही दिवसांनी कॅन्सर सुद्धा नॉर्मल आजार वाटेल. पण त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. त्यामुळे जे रुग्ण येतात त्यांच्याशी सकारात्मक बोला. जेवढा होईल तेवढा प्रयत्न तुम्ही करता त्याबद्दल दुमत नाही. पण काम करताना सगळ्या महत्त्वाचं म्हणजे त्याला दिलासा देणं महत्त्वाचं आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
“रुग्ण बरा होऊन हॉस्पिटलमधून जायला पाहिजे असा आमचा हेतू असतो. त्यामुळे तुम्ही पैशांची चिंता करु नका. तुम्हाला याआधीदेखील मी सांगितलं आहे. पैशांसाठी काही अडलं असं समजू नका. पैसे देणारे आम्हीच आहोत. आजकल हमारा नाम बहुत चल रहा हैं. पैशांची चिंता नाही. एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ”, असं मिश्किल वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं. तसेच पेशंट इथून हसत गेला पाहिजे. काहीही असलं तरी माझा पेशंट आनंदात गेला पाहिजे, असं शिरसाट म्हणाले.
“हे पेशंट गरिबीतून आलेले असतात. तुम्ही पाहा, पेशंटच्या बाजूला बसलेला नातेवाईक हा उपाशी सुद्धा असतो. तो केवळ विचार करतो की, माझा हा नातेवाईक वाचायला पाहिजे. त्याच्याकडे खायला सुद्धा नसतो. तो खाली जाऊन कसा जेवण करतो हे पाहिलं तर तुम्हाला जाणीव होईल की, काय पेशंट असतात, नातेवाईक काय असतात, ते कोणत्या परिस्थितीतून जात असतात”, असं संजय शिरसाट म्हणाले.
व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, काही गैर नाही; टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु : संजय शिरसाट
“आजाराला आता वयाचं भान राहिलेलं नाही. कोणत्याही वयात कॅन्सर आजार होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं आपलं काम आहे. तुम्हाला लागणारी सर्व काळजी आम्ही घेऊ. त्यामुळे आम्ही जेव्हा या रुग्णालयात भेट द्यायला येऊ तेव्हा रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू दिसावं. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत”, असं संजय शिरसाट म्हणाले.

