मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली असून, लोणावळ्याजवळ मालगाडीचा डब्बा रुळावरून घसरल्याने अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. चेन्नई एक्सप्रेस, जोधपूर-हडपसर एक्सप्रेस आणि दिल्ली जयपूर एक्सप्रेस या गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून, लवकरच वाहतूक पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत आणि लोणावळ्याच्या दरम्यान मालगाडीचा डब्बा घसरला आहे. यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहेत. घसरलेला रेल्वे डब्बा लवकर रुळावर आणण्यात येईल आणि वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गाने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अनेक जण मुंबई-पुणे असा नियमित प्रवास करतात. अनेक जण कामानिमित्ताने दररोज असा प्रवास करतात. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्यांनादेखील याचा मोठा फटका बसला आहे. रेल्वे प्रशासनाकडून सध्या वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
मुंबई आणि पुणे यांना जोडणारा देशातील एक महत्त्वाचा व सर्वाधिक व्यस्त असलेला रेल्वेमार्ग सध्या पूर्णपणे ठप्प झाला आहे. खंडाळाजवळील मंकी हिल परिसरात एका मालगाडीच्या सुरक्षा रक्षक बोगीची चाके निखळून पडल्याने घाटामधील रेल्वे वाहतूक थांबवावी लागली आहे. त्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले आहेत आणि रेल्वे वेळापत्रकावरही मोठा परिणाम झाला आहे.
खंडाळाजवळ मंकी हिल परिसरात मालगाडीच्या सुरक्षा रक्षक बोगीची चाके तुटल्यामुळे मोठा अपघात टळला असला तरी त्यामुळे घाटामधील मार्गावर संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. या प्रकारामुळे घाटात असलेल्या अनेक रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर तसेच मालवाहू गाड्यांना कर्जत आणि पळसधरी स्थानकांवर थांबवण्यात आले आहे. प्रवाशांना या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक प्रवासी तासन्तास गाड्यांमध्ये अडकून पडले आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ मदतकार्यात सुरुवात करण्यात आली असून, संबंधित बोगी हटवून ट्रॅक मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झालं असून, शक्य तितक्या लवकर मार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे व ट्रॅक मोकळा झाल्यानंतर लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

