• Thu. Mar 12th, 2026
    विधानपरिषद लक्षवेधी – महासंवाद

    बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कचरा संकलन सेवा आधारित नवीन कंत्राट; कायमस्वरुपी सफाई कामगाराच्या सेवा नियमात कोणताही बदल नाही – मंत्री उदय सामंत

    मुंबई, दि. ११ – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवा आधारित नवीन स्वरुपाच्या कंत्राटामुळे महानगरपालिकेच्या कायमस्वरुपी सफाई कामगाराच्या सेवा नियमामध्ये, अनुकंपा नेमणूक आदी मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होणार नाहीत. या घटकावर कोणताही अन्याय होणार नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

    विधानपरिषदेत सदस्य प्रविण दरेकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी चर्चेमध्ये सदस्य ॲड.अनिल परब यांनी सहभाग घेतला.

    मंत्री श्री. सामंत म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या सेवा आधारित कंत्राटामुळे महानगरपालिकेस शहराला स्वच्छतेच्या सुविधा चांगल्याप्रतीने देणे शक्य होणार आहे. यामध्ये महानगरपालिकेद्वारे दोन पाळ्यामध्ये म्हणजेच सकाळ बरोबरच संध्याकाळीही मुंबईतील रस्ते साफ करणे, कचरा संकलन करणे व वहन करणे या सुविधा देता येणे शक्य होणार आहे. सेवा आधारित कंत्राटामध्ये महानगरपालिकेस येणाऱ्या एकूण खर्चात दररोज 45 लाख रुपये बचत अपेक्षित आहे.

    सद्यस्थितीत घन कचरा संकलन व परिवहन कामगारांचे २७,९०० पदे मंजूर असून सद्या २५,३८५ कामगार कार्यरत आहेत. तसेच मोटर लोडर कामगारांची संख्या ही ६,२५१ आहे व परिवहन खात्यातील कामगारांची संख्या ही ४१६ आहे. नवीन योजनेमध्ये कामगारांना त्याच विभागात झाडलोटीचे काम देण्यात येणार असून शक्यतो त्यांची इतर विभागात बदली केली जाणार नाही. तथापि, आवश्यकता भासल्यास कामगारांची घन कचरा विभागातच इतरत्र बदली केली जाईल. त्यांना कोणत्याही प्रकारचे दुय्यम काम सोपविले जाणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

    0000

    शाळांतील पटसंख्या कमी होण्याकरीता संबंधित अधिकाऱ्यांना देखील कारणे दाखवा नोटीसा बजावणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

    मुंबई, दि. ११ :- बुलढाणा जिल्हा परिषदेच्या विविध शाळांतील पटसंख्या कमी होण्याकरिता शिक्षकाना तात्पुरते निलंबित करण्यात आले असून यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या जातील, असे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

    विधानपरिषदेत सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य धीरज लिंगाडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

    मंत्री श्री. गोरे म्हणाले, चिखली, सागवण, भादुला आदी शाळांचे पटसंख्या चार ते सहा पर्यंत कमी झाली होती. अशा 20 शाळांमधील कार्यरत 30 शिक्षकांचे निलंबन कायम स्वरुपी नाही. या शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास व पटसंख्येत वाढ दिसून आल्यास, निलंबनाबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे.

    जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक ते दहा पटसंख्या असलेल्या ४५ शाळांवर कार्यरत शिक्षकांकडून सन २०२०-२१ ते सन २०२४-२५ या पाच वर्षाच्या पटसंख्येचा अहवाल घेतला असता पटसंख्येबाबत संबंधित शाळांच्या शिक्षकांना घटलेल्या पटसंख्येच्या प्रश्नाबाबत समर्पक खुलासा देता आला नाही. त्यामुळे गत पाच वर्षात सातत्याने पटसंख्या कमी होण्याकरिता दीर्घ कालावधीपासून त्याच शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक जबाबदार असल्याचे आढळून आले होते.

    या शाळांवरील पटसंख्येबाबत गत आठवड्यात पुनःश्च आढावा घेतला असता, ४५ शाळांपैकी ३७ शाळांमध्ये पटसंख्या लक्षणीयरित्या वाढली असल्याचे दिसून आले आहे. प्रयत्नपूर्वक पटसंख्यावाढ केलेल्या शिक्षकांचे निलंबन मागे घेण्याबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे, असे मंत्री श्री. गोरे यांनी यावेळी सांगितले.

    00000

    किरण वाघ/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed