• Mon. Mar 16th, 2026

    नागपूर व अमरावती जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे गतीने करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 7, 2025
    नागपूर व अमरावती जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे गतीने करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. ७ : नागपूर व अमरावती जिल्ह्यात उद्योग, निवासी प्रकल्प आणि वाणिज्य क्षेत्रामुळे वीज मागणी झपाट्याने वाढते आहे. नागपूर व अमरावतीमधील वीज क्षेत्रातील कामांसाठी मंजूर निधीतील कामे गतीने करावीत. तसेच सन २०३५ मध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या लक्षात वीज मागणीसंदर्भात तातडीने नियोजन करावे, दोन्ही जिल्ह्यात वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    विधानभवन येथे नागपूर जिल्हा महावितरण आणि महापारेषण तसेच कोराडी, खापरखेडा प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बैठकीला महसूलमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, ऊर्जा राज्यमंत्री मेघना  बोर्डीकर, आमदार आशिष देशमुख, आमदार मोहन मते, आमदार प्रविण दटके, आमदार चरणसिंग ठाकूर उपस्थित होते.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्ह्यामध्ये वीज क्षेत्रातील मागणी वाढत आहे. विविध पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढली असून विजेची मागणी देखील वाढत  आहे. नागपूर व अमरावती जिल्हयासाठी मंजूर वीज क्षेत्रातील विकासासाठी सध्या मंजूर निधीतून कामे पूर्ण करावीत आगामी कालावधीत अजूनही विविध नवीन प्रकल्प येत आहेत त्यासाठी ऊर्जा विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. वीज क्षेत्रातील कामांसाठी नागपूर मध्ये ७१३ कोटी तर अमरावती जिल्ह्यात २४२ कोटी रूपये निधीची आवश्यकता भासणार आहे यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विविध यंत्रणांकडून होणारे भूमिगत केबलचे नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नवीन प्रकल्पांमुळे वीज वितरण क्षेत्रातील वायरिंगचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित केबल डक्ट  वापरावेत जेणेकरून वीज वितरण वायरिंग सुरक्षित राहील. सुधारित वीज क्षेत्र योजना, कुसुम-ब योजना, मागेल त्याला सौर कृषीं पंप योजना, ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ व नव्या वीज केंद्रांची उभारणी, नवीन वीज उपकेंद्राची मागणी या कामांना प्राधान्य देण्यात यावे.

    बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पर्यावरण तथा वातावरणीय बदल सचिव जयश्री भोज, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. महाऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक डॉ.कांदबरी बलकवडे यासह दूरदृश्य प्रणाली द्वारे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. बिपिन ईटनकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित  होते.

    *****

    संध्या गरवारे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed