Chhagan Bhujbal on Raj and Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर राजकारण तापले आहे. छगन भुजबळ यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देताना, दोन भावांनी एकत्र यावे अशी लोकांची इच्छा असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांचे मतभेद मिटले आहेत का आणि ते निवडणुकीसाठी एकत्र येतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही ते म्हणाले.
“हे स्वभाविक आहे. मूळ शिवसेना मराठी मुद्द्यावर जन्माला आली. याच मुद्द्यावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला माझ्या शुभेच्छा आहेत. मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत. दोन भावांनी एकत्र यावे अशी लोकांची इच्छा आहे. आम्हाला सद्धा असे वाटते की ते एकत्र यावे. पण असं होणार आहे का?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
“राज ठाकरे का दूर गेले ते कारण सुटले का, संपले का? एका कार्यक्रमासाठी ते एकत्र आले आहेत. निवडणुकांसाठी ते एकत्र येतील का? नाही याची मला काही कल्पना नाही. एकत्र येणे शक्य आहे का? ते येणारा काळ सांगेल. आता दोघांनी सांगितले आहे. आम्ही आमच्या भांडण पेक्षा मराठी मुद्दा जास्त महत्वाचं आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“मनापासून एकत्रित येणं हे वेगळं आहे, ज्या मुद्यावर ते वेगळे झाले ते प्रश्न सुटले का? कदाचित पुढे जाऊन ते प्रश्न सुटतील देखील. सभा आणि रॅली पुरता ते एकत्र आले आहेत. पण त्यांचे मनोमिलन झाले पाहिजे ही लोकांची इच्छा आहे. लोकांची इच्छा आहे ते एकत्र आले पाहिजे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
जे बाळासाहेबांना जमलं नाही ते….राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
यावेळी छगन भुजबळ यांनी उद्योगपती सुशील केडिया यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. “मराठी माणूस ज्या राज्यात गेले आहेत त्याठिकाणी ते त्या राज्याची भाषा बोलतात. मराठी बोलणारच नाही हे काही बरोबर नाही जे मंडळी मराठी बोलणार नाहीत असे सांगतात ते परदेशी गेल्यावर इंग्रजी बोलतात”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

