NCP MLA Sangram Jagtap : अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. संग्राम जगताप हे आपली राजकीय दिशा बदलणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या चर्चांनंतर त्यांनी अजित पवारांची आज भेट घेतली. त्यामुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं.
अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार संग्राम जगताप मुंबईत गेले आहेत. आज सकाळी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार आणि आमदार जगताप एकत्र आल्याचे पहायला मिळाले. त्यांचा एकत्रित फोटो जगताप यांनीही सोशल मीडियात शेअर केला. त्यानंतर या भेटीत नेमके काय झाले? यासंबंधी विचारले असता संग्राम जगताप म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यांना कार्यकर्ता म्हणून माझ्या भावना व्यक्ते केल्या आहेत. अर्थात त्यांना म्हणने पटवून देण्याचा अगर मन वळविण्याचा वगैरे प्रयत्न केलेला नाही, तशी गरज वाटली नाही. मला जे सांगयाचे ते सांगितले आहे.’
गेल्या काही काळापासून आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत काही वक्तव्य केली. त्यावरून त्यांच्यासंबंधी वाद निर्माण झाला. अजित पवार यांनी त्यांना चर्चेला बोलाविले होते. मात्र, नगरला दिंडी असल्यामुळे ते गेले नव्हते. अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत त्यांची भेट झाली. याबद्दल सांगताना संग्राम जगताप म्हणाले, “जातीय तेढ निर्माण होऊ नये, अशीच आमची भूमिका आहे. यावर कोणी विनाकारण वाद निर्माण करू नये. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांनी आपण काम केले. आता आपले नेते अजित पवार आहेत. त्यांच्याच विचारांनी आपल्याला पुढे जायचे आहे.”
अशा लोकांना धडा शिकवा, आता अजेंडा राबवण्याची गरज; संग्राम जगताप विजय वडेट्टीवारांवर भडकले
“एकदा ते बोलले की पक्षातील इतर कोणी या विषयावर बोलू नये. नगरमधूनही कोणी बोलणार नाही, तशा सूचना आपण नगरच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत”, असे सांगत जगताप यांनी त्यांच्याच पक्षातून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनाही सुनावले आहे. तसेच हिंदुत्वाची भूमिका घेतली म्हणजे भाजपशी जवळकी ही चर्चाही त्यांनी फेटाळून लावली. २०१४ पासून अशा चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.

