• Sat. Mar 7th, 2026

    श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 19, 2025
    श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

    • परळी औष्णिक विद्युत केंद्राचा आढावा

    बीड दि.१९: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बारा ज्योर्तिलिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास आराखड्यातील कामांची पाहणीही त्यांनी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली. श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी विकास आराखड्यातील कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे सांगून संबंधित कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी विकास आराखड्यातील कामेही दर्जेदार होणे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत प्रत्येकाने बारकाईने लक्ष घालणे आवश्यक आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता, निटनेटके पणा, सर्व सोयी सुविधांयुक्त दर्शन मंडप, तसेच तीर्थक्षेत्र बालाजी, शिर्डी तसेच पंढरपूरच्या धर्तीवर भविष्यात भाविकांना सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

    मंदिराच्या मागील बाजूच्या जागेवर लाईट आणि साऊंड शो करण्यात येणार आहे. लेझर शो करताना किती वेळ शो असेल, त्यामध्ये भाविकांना कोणत्या बाबी दाखविल्या जातील, यासह देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा दर्जेदार असायला हव्यात असे त्यांनी सांगितले.

    जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी श्री क्षेत्र परळी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये 92 कामांना नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात 286.68 कोटीच्या विविध 92 कामांना मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.

    दर्शन मंडपाचे काम, परिसर सुधारणा, मंदिरा भोवती दगडी फरशी, वास्तुशिल्प प्रवेशद्वार, अंतर्गत विद्युतीकरण, सौर दिवे बसविणे, उद्यान विकसित करणे,  संरक्षण भिंतीचे बांधकाम, वाहनतळ यासह सुरू असलेल्या विकास कामांबाबत मुख्य वास्तुविशारद कृष्णकुमार बांगड यांनी माहिती दिली.

    परळी औष्णिक विद्युत केंद्राचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज परळी औष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. शासकीय विश्रामगृह येथील आढावा बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते.

     

    यावेळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी सादरीकरणाद्वारे औष्णिक विद्युत केंद्राबाबत माहिती दिली. यामध्ये प्रस्तावित संच क्रमांक-1 ची मंजुरी व उभारणी, सौर ऊर्जा प्रकल्प मान्यता, राखेचे प्रदूषण व उपाययोजना, औष्णिक विद्युत केंद्राच्या विश्रामगृहाचे नुतनीकरण, थर्मल परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे, थर्मल कॉलनी परिसरात वृक्ष लागवड, सौर ऊर्जा प्रकल्प, आदी विषयांबाबत आढावा घेण्यात आला. परळी औष्णिक विद्युत केंद्राबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आपले सहकार्य असेल असे पवार यांनी सांगितले.

    यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आदी उपस्थित होते.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed