• Sun. Mar 15th, 2026

    मुंबईच्या केईएममध्ये कोरोनाबाधित 2 रुग्णांचा मृत्यू

    ByMH LIVE NEWS

    May 19, 2025
    मुंबईच्या केईएममध्ये कोरोनाबाधित 2 रुग्णांचा मृत्यू

    मुंबई -ललिता पाटील

    आशियाई देशांमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याच्या वृत्तानं पुन्हा एकदा खळबळ माजली असून, आता आरोग्य यंत्रणांनीसुद्धा खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. उपलब्ध माहितीनुसार कोरोनाचा संसर्ग आता मुंबईतसुद्धा भीतीत भर घालताना दिसत आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयात दोन संशयित कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळं शहरात कोरोनाचा शिरकाव झाला का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचणीमध्ये हे रुग्ण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झाल्यानं भीती आणखी वाढत आहे. मात्र संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळं झाल्याचं स्पष्टीकरण केईएम रुग्णालयानं दिलं आहे. मृतांमध्ये 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं म्हटल्यानं केईएम रुग्णालयातील या दोन रुग्णांचे रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळं झाले याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

    आशियाई देशांमध्ये कोरोनाची दहशत.. 

    आशियाई देशांमध्ये एकाएकी कोरोनाची दहशत वाढली असून, हाँगकाँग, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं रुग्णसंख्येत भर पडताना दिसत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत 28 टक्क्यांची वाढ झाली.  गेल्या दोन आठवड्यांमध्ये भारतही या संसर्गाच्या विळख्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. साधारण आठवडाभराची आकडेवारी पाहिल्यास देशात गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 93 वर पोहोचली आहे. भारतात कोरोना चाचण्यांची संख्या कमी असतानाही रुग्णसंख्या वाढलेल्यानं आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. दरम्यान या परिस्थितीमध्ये घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी केलं आहे. 

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed