• Sat. Mar 7th, 2026

    Sharad Pawar : ‘तिसऱ्या देशाने नाक घालायचं कारण नाही’, अमेरिकेच्या मध्यस्थीवर शरद पवार स्पष्टच बोलले

    Sharad Pawar : ‘तिसऱ्या देशाने नाक घालायचं कारण नाही’, अमेरिकेच्या मध्यस्थीवर शरद पवार स्पष्टच बोलले

    Sharaf Pawar on India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान तणावावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या प्रकरणात तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही. त्यांनी शिमला कराराचा दाखला देत, दोन देशांमधील विषय आम्हीच सोडवू शकतो, असं स्पष्ट केलं. अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती? असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागेल, असंही ते म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना भारत-पाकिस्तान तणावावर भाष्य केलं. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत घोषणा केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता, शरद पवारांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. शिमला करारानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील विषयांवर तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले. “साधी सरळ गोष्ट आहे. मी शिमला कराराचं उदाहरण दिलं ते काय सांगतं? आमचा विषय आम्ही बसवून सोडवू. तिसऱ्या देशाने नाक घालायचं कारण नाही”, असं शरद पवार स्पष्टपणे म्हणाले.

    “मला जे आठवतं, शिमला करार हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गाधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात झाला होता. त्या करारात एक मुद्दा असा आहे की, काश्मीरच्या प्रश्नावर कुणाचा सल्ला घ्यायचा आहे. दोन देशातील हे अॅग्रीमेंट आहे. असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती? असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागेल”, असं शरद पवार म्हणाले.

    “विशेष अधिवेशन बोलावलं तर माझा काही विरोध नाही. पण जो इशू आहे त्यावर खुली चर्चा असू शकत नाही. याआधी एक-दोन घटना घडल्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी मला आणि काही लोकांना बोलावलं. आमच्याबरोबर बैठक घेतली. कुठे काय झालंय याची कल्पना दिली. त्यादिवशी काय घडलं याची कल्पना दिली. त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. विशेष अधिवेशनात अपेक्षा काय असणार? काय नेमकं झालंय हे सांगायला सरकारला मर्यादा येतील. विशेष अधिवेशन बोलवायचं असेल तर हरकत नाही. पण त्यापेक्षा वन टू वन बैठक झाली. या बैठकीला लष्कराचे जवान देखील होते”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

    यावेळी शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. याबाबत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “बघुया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकूया. तुम्ही ऐका आणि मीही ऐकतो”, अशी प्रतिक्रिया दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed