• Sat. Mar 7th, 2026
    लातूरनंतर नांदेडमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्राचा प्रकार, पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

    Nanded Ardhapur Rural Hospital Illegal Work : मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता नांदेडमध्ये ही बनावट जन्म प्रमाणपत्राचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ८२ बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.

    (फोटो– Lipi)

    अर्जुन राठोड, नांदेड : मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता नांदेडमध्ये ही बनावट जन्म प्रमाणपत्राचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून (Nanded Ardhapur Hospital) पासपोर्टसाठी तब्बल ८२ बनावट जन्म प्रमाणपत्र (Fake Birth Certificate) देण्यात आला आहे. पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी नगर पंचायतीचे आणि मुख्याधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तयार केल्याची माहिती आहे.

    नांदेडमधील रहिवाशी खान उझमा यांनी पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज केला होता. पण खान उझमा यांच्या जन्म प्रमाणपत्रावर संशय आल्याने पासपोर्ट कार्यालय मुंबई यांनी सत्यतेबाबत अर्धापूर नगर पंचायातीकडे विचारणा केली. जन्म प्रमाणपत्रावर अर्धापूर नगर पंचायतीचा बनावट सही शिक्का मारण्यात आल्याचे उघड झाले. अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाचा आय डी वापरून त्यावरून जन्म प्रमाणपत्र काढून त्यावर नगर मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही आणि शिक्का मारण्यात आला होता. सही शिक्का खोटा असल्याचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी पासपोर्ट कार्यालयाला कळवले. त्यानंतर आरोग्य विभागाने चौकशी केली असता तब्बल ८२ बनावट जन्म प्रमाणपत्र अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आल्याचे समोर आले.
    Nagpur News : नागपूरच्या मेयो वैद्यकीय महाविद्यालयात जेवणात अळ्या; खळबळजनक प्रकार समोर
    अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाची सुरुवात जानेवारी २०२२ ला झालेली असताना कित्येक वर्षाआधीचे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. १९७५ पासूनचे बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. ओटीपीचा गैरवापर करून कंत्राटी कर्मचारी एतेशामोद्दीनने हे बनावट जन्म दाखले दिल्याचा ठपका आरोग्य विभागाने ठेवला. ऑगस्ट २०२४ पासून हे जन्म दाखले देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून एतेशामोद्दीन आणि इतरांविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे एकाच विशिष्ट समाजातील नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. यामागे मोठं रॅकेट आहे का? याची खात्री करण्यासाठी आरोग्य विभागाकडून कागदपत्र जमा करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भोसले यांनी दिली.

    सीआयडी, एसआयटी मार्फत चौकशी करा

    बहुतांश प्रमाणापत्र हे नांदेड जिल्ह्यातील लोकांना देण्यात आले आहेत. या ८२ लोकांनी बनावट जन्म प्रमाणपत्र का काढले? त्यांचा उद्देश काय? अवैध मार्गाने भारतात आलेल्या बांगलादेशीचा यात समावेश आहे का? आदी प्रश्न उपस्थ‍ित होत असून गुन्ह्याची व्याप्ती व आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गंभीर प्रकार असल्याने सीआयडी, एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

    तपासणीत आढळली अनियमितता

    या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या मार्फत एक चौकशी समिती स्थापन करुन तपासणी करण्यात आली. यात अनियमितता आढळून आल्याचा अहवाल समितीने २८ एप्रिल रोजी सादर केला. या चौकशी अहवालाच्या आधारे चौकशी समितीचे सचिव तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ रामभाऊ बुट्टे यांनी अर्धापूर पोलिस ठाण्यात ग्रामीण रूग्णालयाच्या एका कर्मचाऱ्या विरूद्ध ३० एप्रिल रोजी तक्रार दाखल केली.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed