Pune BJP Operation Lotus : पुण्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना काँग्रेसला ‘रिकामं’ करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.
“काँग्रेसला फोडो आणि रिकामी करा”, असे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. याच बैठकीत बावनकुळे यांनी संबधित वक्तव्य केल्याचं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ने दिलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसची लोकं आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार, असंदेखील आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपच्या गोटात काय सुरु?
भाजपच्या गोटात सध्या प्रचंड घडामोडी सुरु आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी भाजप पक्ष स्थानिक पातळीवर भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. भाजप पक्षाकडून जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवर नव्याने नियुक्तया केल्या जाणार आहेत. यामध्ये नव्या चेहऱ्यांनादेखील संधी दिली जाण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी आपली वर्णी लागावी यासाठी अनेक नेत्यांकडून अंतर्गत फिल्डिंग लावण्यात आल्याची देखील चर्चा आहे. असं असलं तरी पक्षाकडून कुणाची निवड होते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांची नावे येत्या 10 तारखेला जाहीर करणार असल्याची देखील माहिती आता समोर येत आहे. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. या निर्णयानंतर 10 तारखेला यादी जाहीर केली जाईल, अशी देखील माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील बैठकीत दिल्याची माहिती आहे.

