• Wed. Mar 11th, 2026

    मटा इम्पॅक्ट! ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या बातमीनंतर आदिवासी पाड्यावर ६०० किमीवरून मदतीचा हात

    मटा इम्पॅक्ट! ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या बातमीनंतर आदिवासी पाड्यावर ६०० किमीवरून मदतीचा हात

    Mata Impact News : नंदुरबार जिल्ह्यातील हेंद्र्यापाड्यातील आदिवासी महिलांच्या पाणीटंचाईच्या बातम्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केल्यानंतर, पुण्यातील ‘सहयोग’ संस्थेने मदतीचा हात पुढे केला. संस्थेने तात्पुरती टँकरची सोय केली, ज्यामुळे गावकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

    (फोटो– Lipi)

    नंदुरबार, महेश पाटील : धडगाव तालुक्यातील बिलगांव- हेंद्र्यापाडा येथील आदिवासी महिलांचा हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातला जीवघेणा प्रवास आणि भटकंती करावी लागत होती. याबाबतची बातमी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल घेत पुण्यातील सेवाभावी संस्थेने हेंद्र्यापाडा येथील नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत टँकरची व्यवस्था केली. त्यामुळे काही प्रमाणात पावसाळ्यापर्यंत गावकऱ्यांची सोय झाली. अशी भीषण पाणीटंचाई असतानाही प्रशासनाचे मात्र या पाड्याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.

    धडगांव तालुक्यातील बिलगांव-हेंद्र्यापाडा गांवातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगरद-यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे.डोंगरद-याची एवढी बिकट वाट आहे की, हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो; घरात अर्धा हंडाच पाणी पोहचते.

    हेंद्र्यापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहचली आहे,पाणी मात्र पोहचलेच नाही.या पाड्यांची एकूण १३० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. हेंद्र्यापाडा हा बिलगाव ग्रामपंचायतीतील आहे. या पाड्यात जाण्यासाठी रस्ता नाही. येथे वीजही पोहोचलेली नाही. या वाड्यातील महिला तसेच नागरिकांना पाण्यासाठी डोंगरदऱ्यात उतरून खडतर प्रवास करत पाण्याची व्यवस्था करावी लागत होती. याबाबतची बातमी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन ने 8 एप्रिल रोजी प्रकाशित केली होती. बातमी वाचून सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या हेंद्र्यापाडा येथील नागरिकांचा मदतीला पुणे येथील “सहयोग – Together We Can Do It” ही संस्था धावून आली.

    वृंदा पंचवाघ यांच्यासह त्यांच्या टीमने हेंद्र्यापाडा येथे जाऊन पाहणी केली. मात्र त्या ठिकाणी रस्ता नसल्याने जिथपर्यंत टँकर जाईल तिथपर्यंत जाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे गावकऱ्यांना टँकरद्वारे पाणी मिळणार आहे. काही प्रमाणात गावकऱ्यांच्या पाणी समस्याचे निवारण होणार आहे. हेंद्र्यापाडा येथील नागरिकांच्या मदतीला 600 किलोमीटरवरून एक सेवाभावी संस्था मदतीला आली मात्र नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

    महेश पाटील

    लेखकाबद्दलमहेश पाटीलमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये नंदुरबार प्रतिनिधी म्हणून कार्यरत. 2003 ते 2014 दरम्यान विविध वृत्तपत्रात फोटोग्राफर म्हणून सुरुवात. त्यानंतर विविध वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून प्रवास करीत मटा ऑनलाईन पर्यंत वाटचाल.राजकीय बातम्यांमध्ये विशेष हातखंडा, विशेष स्टोरी शोधण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed