Sameer Bhujbal VS Suhas Kande : नाशिकमध्ये माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात पुन्हा वाकयुद्ध सुरू झाले आहे. समीर भुजबळ यांनी आपला राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा अजून स्वीकारला नसल्याचा दावा केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुहास कांदे यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली. ‘अजित पवारांनी हुसकलेला माणूस’ असे कांदे म्हणाले. तसेच, ईडी आणि सीबीआयपासून वाचण्यासाठी भुजबळ अजित पवारांच्या पुढेपुढे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
समीर भुजबळ नेमकं काय म्हणाले?
“राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्षपदाचा मी राजीनामा दिलाय. पण तो आतापर्यत स्वीकारला गेलेला नाही. मी पक्षातच आहे. मी विधानसभा निवडणुकीनंतरही पक्षाच्या मुंबई आणि इतर ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये होतो”, असं समीर भुजबळ म्हणाले आहेत. समीर भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला होता. असं असताना समीर भुजबळ आपला राजीनामा स्वीकारला गेला नसल्याचं बोलत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
सुहास कांदे काय म्हणाले?
समीर भुजबळ यांच्या वक्तव्यावर सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी समीर भुजबळ यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली. “अजित दादांच्या पुढे-पुढे करणे, दादांची हाजी-हाजी करणे, आणि मग युतीबरोबर थांबणे. समीर भुजबळ बरोबर तरी वैयक्तिक दया येते. छगन भुजबळांचं ठिक आहे. त्यांचं वय झालं. पण समीर भुजबळांची मला दया येते. शुद्ध भाषेत आपण एखाद्या प्राण्याला हुसकतो आणि तो प्राणी आपल्याकडे परत परत येतो त्याचप्रमाणे याला हुसकलं जातं आणि हा येतो”, अशी खोचक टीका सुहास कांदे यांनी केली.
समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढली होती. महायुतीत नांदगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी अधिकृतपणे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना मिळाली होती. त्यामुळे समीर भुजबळ यांनी युती धर्माचं पालन करत सुहास कांदे निवडून यावेत यासाठी काम करणं अपेक्षित होतं. पण समीर भुजबळ यांनी सुहास कांदे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी लढवली. तसेच त्यांनी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या काळात कांदे आणि भुजबळ यांच्यात प्रचंड संघर्ष बघायला मिळाला होता. यानंतर आता पुन्हा संघर्ष होताना दिसत आहे.

