Food and Drug Administration Big Decision : मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरत असल्याचं उघडकीस आलं आहे. अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या प्रकरणी कठोर पाऊल उचलले आहे. हॉटेलमध्ये शुद्ध पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरल्यास, ते मेन्यू कार्डात नमूद करणे अनिवार्य आहे. अन्यथा परवाना निलंबित केला जाईल, असा इशारा नार्वेकर यांनी दिला आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट किंवा फास्ट फूड विक्रेते, केटरर आदींकडून दुधापासून बनविलेल्या शुद्ध पनीरऐवजी चीज ॲनालॉग या पनीरसारख्याच दिसणाऱ्या पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. शुद्ध पनीरपेक्षा हे ॲनालॉग चीज स्वस्त असल्याने ते विक्रेत्यांना किफायतशीर ठरते. मात्र ग्राहकांची यात फसवणूक होत असते. याबाबत मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी मोहीम हाती घेण्याचे जाहीर केले होते. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी वरील आदेश दिले.
गुणवत्तापूर्ण पनीर चवीला उत्तम, मऊसूत आणि प्रथिनांचा पुरेपूर साठा असणारे असते. तर चीज अॅनालॉग हे वनस्पती तेल आणि दूध वा दुधाची भुकटी एकत्र करून तयार केले जाते. ते चिवट, बेचव आणि अत्यल्प पोषणमात्रा असणारे असते. तसेच आरोग्यासाठीही अपायकारक असते. पर्यायी पदार्थ म्हणून ते वापरणे, ही एका अर्थाने ग्राहकांची फसणवूक आहे.
व्यावसायिकांसाठी कार्यशाळा
जे व्यावसायिक चीज ॲनालॉगचा वापर करीत असतील, त्यांनी मेन्यूकार्ड, डिस्प्ले बोर्ड आदीवर त्याचा उल्लेख करणे बंधनकारक असणार आहे. तसे न केल्यास संबंधितांचा परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याबरोबरच यासंदर्भात हॉटेल असोसिएशनने कार्यशाळेचे आयोजन करण्याची सूचनाही यावेळी केली आहे.

