Ranjit Kasale on Walmik Karad : निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी पुण्यात खळबळजनक आरोप केले आहेत. वाल्मिक कराड एन्काउंटर प्रकरणी बोलण्यास नकार देत, त्यांनी विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याचा दावा केला. कासले यांनी बोगस एन्काउंटर कसा होतो, याची माहिती देत, त्यांना मिळालेल्या एका कथित ऑफरबाबत मोठा दावा केला.
“एन्काउंटरचा प्रश्न थोडे बाजूला ठेवा. कारण मला एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले की पुरावे आहेत का? सरकार काही वेडे नाही की पुरावे असायला, मला एका पत्रकाराने विचारलं की, तुम्हाला एन्काउंटरचा आदेश दिला होता का? अरे एन्काउंटरचा कुणी आदेश देणार का? या बंद दाराआडच्या चर्चा आहेत”, असं रणजित कासले यांनी सांगितलं.
रणजित कासलेंचा बोगस एन्काउंटरबाबत मोठा दावा
“बोगस एन्काउंटर काय असतं ते आधी समजावून सांगतो. केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहसचिव, सचिव यांच्यात गुप्त बैठक होते. जसं इक्षय शिंदेचं झालं. केंद्राकडून सिग्नल मिळाल्यानंतर केंद्रातून चार-पाच अधिकारी येतात. ते स्थानक पातळीवरचे चार-पाच अंमलदार निवडतात. त्यांच्यामार्फत बोगस एन्काउंटर केला जातो. तशीच ऑफर मला होती. कारण त्या ऑफरचे तुम्हाला पुरावे मिळणार नाहीत. कारण शासन किंवा आयपीएस-आयएएस लोकं खूप हुशार असतात. बंद दाराआड चर्चा होते”, असा दावा रणजित कासले याने केला.
“मला ऑफर अशी होती की, तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉलव्हर घेऊन 24 तास राहा. तुम्हाला कुठे चुकीची वाटलं तर कारवाई करा, अशी ऑफर होती. माझी 25 वर्षांची नोकरी अजून राहिली असेल तर तेवढ्या वर्षांत माझा जेवढा पगार होईल, समजा 15 कोटी तर तुम्हाला लमसम 50 कोटी मिळतील. तसेच पुन्हा चौकशी करतानादेखील आमचं सरकार राहील. त्यातून तुम्हाला आम्ही निर्दोष मुक्त करु अशी ऑफर असते”, असं रणजित कासलेने सांगितलं.
“तुम्हाला स्टेशन डायरी मिळेल. तुम्ही आधी माहिती अधिकारातून अर्ज करा. बीड पोलीस अधिक्षक यांना अर्ज करायचा. तुम्हाला स्टेशन डायरी मिळेल. कोण कुणाला भेटलं याची सविस्तर माहिती मिळेल. आयपीएस, आएएस अधिकारी हे बाहेरचे असतात. त्यामुळे त्यांची नावे लक्षात नाहीत. वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर 4 दिवसांतच हे अधिकारी आले होते. त्यांचे लोकेशन, नाव भेटतील. तुम्ही माहितीचा अर्ज करा. माझ्या घरात काल चार जण घुसले. माझ्या घरात घुरफोडी झाली. माझ्या घरात भरपूर पुरावे होते. माझ्या कपाटात खूप काही पेपर होते. मी बीडमध्ये राहतो. जीएसटी भवनच्या समोर माझं घर आहे. त्याठिकाणी पोलिसांनी माझ्या घराला सस्पेंडची नोटीस लावली. चार लोकांनी माझ्या घराचं लॉक तोडलं आणि घरात शिरले. त्यांनी दुसरं लॉक लावलं आहे. तिथे जीएसटी भवन आहे”, असं रणजित कासले म्हणाले.
“वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते. कारण ते 302 मध्ये पूर्णपणे फसले आहेत. आता मीही फसेन या भीतीपोटी ही ऑफर असेल. माझ्या बीड जिल्ह्यात सात बदल्या झाल्या तर मी किती वादग्रस्त असेल. त्यामुळे मला ही ऑफर देण्यात आली. चार-पाच जणांना ऑफर असते. पण सगळे बोलत नाहीत. मी नकार दिला. मी ऑलरेडी सस्पेड झालो आहे म्हणून बोलत आहे”, असं देखील रणजित कासले यांनी सांगितलं.

