• Thu. Mar 12th, 2026

    Sangram Thopate : काँग्रेसमध्ये भूकंप, संग्राम थोपटे राजीनामा देणार? भाजप प्रवेशाच्या चर्चा

    Sangram Thopate : काँग्रेसमध्ये भूकंप, संग्राम थोपटे राजीनामा देणार? भाजप प्रवेशाच्या चर्चा

    Sangram Thopate will be Resign Congress : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेला भाजप पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे. कारण काँग्रेसचा आणखी एका बडा नेता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अभिजीत दराडे, पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडीतील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेला भाजप पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे. कारण काँग्रेसचा आणखी एका बडा नेता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे आणखी काही बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधील आणखी कुणी भाजपच्या गळाला लागतं का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.

    संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्ली तर काँग्रेसची पुण्यात मोठी हानी होईल. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आता थेट संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. संग्राम थोपटे यांनी आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण संग्राम थोपटे यांचा 22 एप्रिलला भाजप प्रवेश निश्चित असल्याची चर्चा आहे.

    संग्राम थोपटे हे भोर – राडगड- मुळशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते या मतदारसंघातून 3 वेळा आमदार म्हणून जिंकून आले आहेत. संग्राम थोपटे यांचा भोर मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे. त्यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील माजी शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे हे या मतदारसंघातून तब्बल 6 वेळा या मतदारसंघातून जिंकून आले आहेत. त्यामुळे संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केल्यास भाजपला मोठा फायदा होईल.

    संग्राम थोपटे यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास

    संग्राम थोपटे यांचं आतापर्यंतची प्रदीर्घ अशी राजकीय कारकीर्द राहिलेली आहे. त्यांना राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचा राजकीय वारसा मिळाला आहे. त्यामुळे त्यांना राजकारणाचा बाळकडू आपल्या वडिलांकडूनच मिळाला. संग्राम थोपटे हे भोर पंचायत समितीचे 2002 ते 2003 या काळात उपसभापती होते. तर 2007 ते 2024 या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहिलेले आहेत. याशिवाय ते याच काळात भोर येथील राजगड सहकारी साखर कारखाना अनंतनगर निगडे याचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. तसेच 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी लढवली होती. या निवडणुकीत ते जिंकून आले होते. यानंतर ते 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही जिंकून आले होते.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed