Eknath Shinde Raj Thackeray Meeting : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा टायमिंग देखील महत्त्वाचा आहे. महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना डावललं जात असल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे हे दबावाचं राजकारण आहे की नव्या युतीची नांदी आहे? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीमागे शासकीय कामकाजांचं कारण सांगत असले तरी त्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसावी हे शक्यच नाही. एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊनच उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला गेले असावेत, असा अंदाज आहे.
भेटीचा टायमिंग मत्त्वाचा
विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा टायमिंग देखील महत्त्वाचा आहे. महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना डावललं जात असल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सातत्याने समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या अर्थखात्याची तक्रार केल्याची देखील माहिती समोर येत होती. या सगळ्या घडामोडींदरम्यान आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट घडत आहे.
शिंदेंची रणनीती काय? दबावाचं राजकारण?
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक तर सर्वात जास्त महत्त्वाची आहे. या निवडणुकीत महायुतीत भाजपकडून जागावाटपात मित्रपक्षांना अपेक्षित जागा दिल्या जाऊ शकतात का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण शिवसेनेची अनेक वर्षांपासून मुंबईत सत्ता राहिलेली आहे. पण आता शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची मुंबईत ताकद आहे. कारण विधानसभा निवडणुकीत ते बघायला मिळालं. त्यामुळे त्या ठाकरेंचा सामना करायचा असेल तर दुसरे राज ठाकरे आपल्यासोबत असतील तर त्याचा आपल्याला फायदा होईल, अशी रणनीती एकनाथ शिंदे यांची असू शकते. राज ठाकरे हे रोखठोक मतं मांडणारे नेते आहेत. ते त्यांच्या आक्रमक भाषणातून लाखो नागरिकांची मतं वळवू शकतात. याशिवाय राज ठाकरे सोबत असले तर भाजपवरही दबाव मिळवता येईल, अशी रणनीती एकनाथ शिंदे यांची असू शकते.
शिंदेंसोबत राजकीय मैत्री केल्यास राज ठाकरेंना फायदा?
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत हातमिळवणी केली तर मनसेला देखील सत्तेत येण्याची संधी मिळेल. यामुळे पक्षाती ताकद साहजिक वाढेल. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकीय युती करणं हे राज ठाकरे यांच्यासाठी देखील फायदेशीर ठरु शकतं. त्यामुळे या भेटीत नव्या राजकीय समीकरणाचा जन्म होतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
नेमकी भेट का? सामंतांचे सूचक संकेत?
एकनाथ शिंदे यांच्या भेटीपूर्वी मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी आपण वेगळ्या कार्यक्रमात होतो. आपल्याला अचानक फोन आला आणि आपण इथे आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच मनसे आणि शिवसेनेची युती झाली तर आपल्याल आनंदच होईल, असं सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर दाखल झाले तेव्हा उदय सामंत परत माध्यमांसमोर आले. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर शिंदे प्रतिक्रिया देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आपण भेटीनंतर प्रतिक्रिया देणार हा एकनाथ शिंदे यांचाच मेसेज असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. याचाच अर्थ ही सदिच्छा भेट नसून राज ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं त्या अनुषंगाने प्रतिक्रिया देण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी अशाप्रकारचा मेसेज पाठवल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.