• Thu. Apr 24th, 2025 7:28:25 AM
    गडचिरोलीत दीड कोटी रुपयांचा धान घोटाळा! दोषींवर कडक कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    Gadchiroli Paddy Scam: ‘धान खरेदी व साठवण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल,’असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    paddy scam AI

    म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील धानाच्या साठ्याची शंभर टक्के तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ‘पॅडी होर्डिंग को-ऑर्डिनेशन’ कमिटीच्या बैठकीत नियमभंग करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. ‘धान खरेदी व साठवण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल,’असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

    गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या देऊळगावच्या धान खरेदी केंद्रावर दीड कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

    गडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. या धानाची आदिवासी विकास महामंडळाकडून स्थानिक सोसायटीमार्फत खरेदी केली जाते. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले हे धान मिलिंगसाठी पाठविले जाते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान खरेदी केंद्रावर गैरव्यवहार होतो. यातूनच २०२३-२४च्या हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान आणि बारदानासंदर्भात झालेल्या तपासणीत १९ हजार ८६० क्विंटल धान आणि ४९ हजार ७५१ बारदाण्यात तफावत आढळली. यात प्रामुख्याने ३ हजार ९४४ क्विंटल धान आणि १४ हजार १४८ बारदाना कमी आढळला. इतकेच नव्हे तर भरडाईसाठी पाठविण्यात आलेल्या धानात ४० ऐवजी ३० किलो धान भरण्यात आल्याचे दिसून आले आहे. या माध्यमातून १ कोटी ५३ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

    कुठे काय घडतेय?
    अहेरी येथील शासकीय धान्य गोदामातील अपहारप्रकरणी गोदाम व्यवस्थापक व रक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात २२ लाख ४२ हजार रुपयांची वसुली सुरू आहे. या प्रकरणी सहा अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू आहे.

    सिरोंचा येथील २०११मधील धान्य अपहारप्रकरणी २४.८ लाखांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी दहा अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी प्रस्तावित आहे.

    २०११मधील धान घोटाळ्यात २.६७ कोटींच्या दंडापैकी १.३५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित ७२ लाख रुपयांची वसुली न करणाऱ्या १३ राईस मिलर्सच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू आहे.

    साठ्याची शंभर टक्के तपासणी होणार
    गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील धानाच्या साठ्याची शंभर टक्के तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ‘पॅडी होर्डिंग को-ऑर्डिनेशन’ कमिटीच्या बैठकीत नियमभंग करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. ‘धान खरेदी व साठवण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, ‘असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed