Manikrao Kokate Apologizes : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना केलेल्या वादग्रस्त विधानावर अखेर माफी मागितली आहे. माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांसमोर जाहीरपणे माफी मागितली आहे. त्यांच्या वक्तव्यावर राज्यभरात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना माफी मागावी लागली आहे.
“महाराष्ट्रात अतिवृष्टी, गारपीट आणि चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणारच आहे. पण यापुढेही शेतकऱ्यांचं कमी नुकसान व्हावं. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून आज मुहूर्त साधून काळाराम दर्शनाला आलो होतो. या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना समृद्धी आणि सुख मिळो अशी प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना केली आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांसाठी येणारे दिवस निश्चितच चांगले असतील. यावर माझा विश्वास आहे”, असंही माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
“तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात, त्या पैशांचे तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईला, जलसिंचनाला, शेततळ्याला पैसे, सगळ्या गोष्टींना पैसे. शेतात भांडवली गुंतवणूक कोण करतं? तर सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, ह्याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडा करा, लग्न करा”, असं वादग्रस्त वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद पडलेले बघायला मिळाले. त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्यावर चौफेर टीका केली जात होती. अखेर माणिकराव कोकाटे यांनी माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
माणिकराव कोकाटे यांनी याआधीही केलंय वक्तव्य
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत याआधीसुद्धा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “हल्ली भिखारी सुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे. पण या योजनेलाही गैरव्यवहाराची ग्रहण लागले. योजना बंद करायची नाही. पण सुधारणा कराव्या लागतील”, असं वादग्रस्त वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुनही मोठा राजकीय वाद झालेला बघायला मिळाला होता.