CM Devendra Fadnavis on Nagpur Outrage : नागपुरातील चिटणीस चौकात दोन गटांत मोठा राडा झाला आहे. यानंतर याचे रुपांतर हाणामारीत झाले आहे. दगडफेक, जाळपोळ आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण तापले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तणावग्रस्त परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर ‘आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात आहोत. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरेवरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. ती कबर म्हणजे आपल्या गुलामीचे प्रतीक आहे. त्यामुळे ती कबर कायमस्वरूपी हटविण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे करण्यात आली आहे. सरकारने कबर न हटविल्यास आम्ही पुन्हा एकदा कारसेवा करून बाबरी मशिदीप्रमाणेच ही कबर नेस्तनाबूत करा, अशी भूमिका घेत आंदोलन छेडण्यात आले. परंतु यावरुन आता हिंसक वळण लागले आहे.

