• Wed. Mar 11th, 2026
    Nagpur Violence : नागपुरातील वातावरण तापले, वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; म्हणाले, ‘बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना…’

    Vijay Wadettiwar on Nagpur Outrage : नागपुरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. परिणामी शहरात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर : नागपुरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. परिणामी शहरात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. या आंदोलनात मात्र मुस्लीम समुदायाचा धर्मग्रंथ कुराणाच्या प्रती आणि मुस्लिम समुदायाचा ध्वज देखील जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे दोन गट आमनेसामने आले आणि राडा झाला आहे. दगडफेक, जाळपोळ आणि घोषणाबाजी केल्याने वादाला हिंसक वळण लागले आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘हे सगळं मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे,’ असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

    वडेट्टीवार आपल्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हणाले, ‘नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावलेले आहे. हे सगळं मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.’ अशी मागणीही त्यांनी केली.

    वडेट्टीवारांनी पुढे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. ‘जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत.’ असे वडेट्टीवार म्हणाले. तर या स्थितीत ‘नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी.’ असे आवाहनही वडेट्टीवारांनी केले.

    दरम्यान, नागपुरामध्ये ओरंगजेबाची कबर हटवण्याच्या कारणावरुन हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. पण यात दुसऱ्या गटाच्या काही लोकांनी त्यांच्या आंदोलनावर आक्षेप घेतला. यातच सायंकाळी सात वाजता दोन्ही गटाकडून घोषणाबाजी सुरु झाली होती. परिणामी नागपूरच्या महाल परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. पण रात्री ९ वाजता परिस्थिती चिघळली आणि दगडफेक, जाळपोळ कऱण्यात आली. पोलीस एका गटाला पांगवण्यात यशस्वी ठरले पण दुसऱ्या गटाकडून जोरदार दगडफेक केली जात होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहता पोलिसांकडून अश्रूधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी कार्यरत आहेत. तर संशयितांना ताब्यात घेण्यात येत आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed