Raigad Crime News : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका महिलेसोबत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महिलेला निर्दयी वागणूक दिल्याची घटना म्हसळा तालुक्यातून समोर आली आहे.
रायगडच्या म्हसळा तालुक्यतील कुडतुडीवाडीतून ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पीडित महिला घरी कपडे धूत असताना तिचा पहिला नवरा व त्याचा मित्र अचानक दरवाजा ढकलून घरात घुसले. त्यांनी तिच्यावर थेट हल्ला चढवला. दोघांनी महिलेच्या डोक्यात धोपटने घालून तिला खाली पाडले.एवढ्यावरच न थांबता नवऱ्याच्या मित्राने तिचे तोंड उशीने दाबून ठेवले आणि ‘हिचा काटा बऱ्याच दिवसांपासून काढायचा होता, आता चान्स मिळाला आहे, हिला जिवंत सोडायचे नाही’ असे म्हणत तिच्या गळ्यावर स्क्रू-ड्रायव्हर दोन ते तीन वेळा खुपसला. यामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.
पीडित महिलेने याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी दुर्वेश धाडवे (रा.नळेफोडी-माणगाव) आणि त्याच्या अज्ञात मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. तर तिला म्हसळा येथून उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ती जीवन-मरणाची लढाई लढत आहे.

