Eknath Shinde on bhaiya ji joshi : आरएसएसचे नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरु नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भैय्याजी जोशी यांचं समर्थन करत त्यांनी मराठीचा अपमान केलेला नसल्याचं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“काही लोकं जे राजकारण करत आहेत त्यांनी ते थांबवावं. भैय्याजी जोशी यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. महाराष्ट्राची आणि मुंबईची मराठी भाषाच महत्त्वाची आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. प्रथम भाषा ही मराठी भाषा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी जे म्हटलं की इथे सर्व समाज एकत्र राहतात. याचा अर्थ त्यांनी मराठी भाषेचा अपमान केलेला नाही. त्यांनी मराठी भाषेला दुय्यम समजलेलं नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
भैय्याजी जोशी यांचं स्पष्टीकरण
आपल्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाल्यानंतर भैय्याजी जोशी यांनी भूमिका मांडली. “मुंबईच्या उपनगरमधील घाटकोपर येथे आयोजित कालच्या एका कार्यक्रमात माझ्याकडून करण्यात आलेल्या एका वक्तव्याबाबत गैरसमज झाल्याचं मला वाटत आहे. मुंबईची भाषा मराठी नाही, असा प्रश्नच उपस्थित होत नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे. स्वाभाविकपणे मुंबईची भाषा मराठी आहे”, असं स्पष्टीकरण भैय्याजी जोशी यांनी दिलं.Gunratna Sadawarte : ‘राज ठाकरे तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?’ गुणरत्न सदावर्ते यांचा घणाघात, भय्याजी जोशींचं समर्थन
“भारतात विविध भाषा बोलल्या जातात. मुंबईतही विविध भाषिक नागरीक राहतात. त्यामुळे स्वाभाविकपणे अपेक्षा असते की, मुंबईत राहणाऱ्या अमराठींनी मराठी शिकावं, बोलावं. हा आग्रह असायलाच हवा. कारण प्रत्येक राज्याची ती ओळख आहे. हे एक सहअस्तित्वाचं खूप मोठं उदाहरण आहे की, भारतात विविध भाषेचे लोक एकत्र येऊन परस्परांना सहकार्य करतात पुढे जातात. मुंबई हे त्याचं उत्तम उदाहरण आहे”, असं भैय्याशी जोशी म्हणाले.
“स्वाभिवकपणे अपेक्षा आहे की, मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी बोलावं, मराठी शिकावं. या व्यतिरिक्त माझं काही म्हणणं नाही. मी स्वत: मराठी भाषिक आहे. माझी मातृभाषा मराठी आहे. माझ्या अंत:करणात मराठी आहे. पण मी सर्व भाषांचा सन्मान करतो. भारताने हे एक अनोखं उदाहरण प्रस्तुत केलं आहे. आपण त्याकडे तसंच बघावं हीच माझी विनंती आहे”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.