• Tue. Mar 10th, 2026

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी बातमी फोडली, विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी बातमी फोडली, विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

    Uddhav Thackeray clarifies on Leader of Opposition position : “भाजपला विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव चालणार होतं हे मला आधी कळलं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे घराणेशाहीला त्यांचा विरोध नाही हे मला कळलं असतं तर बरं झालं असतं”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : विधान भवनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी कुणाची नियुक्ती करावी, याबाबत चर्चा झाली. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही अडीच वर्षे विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली जात होती, अशी माहिती समोर आली. तसेच काँग्रेसकडूनही विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली जात असल्याची माहिती समोर आली. पण या सर्व चर्चांचा दावा उद्धव ठाकरे यांनी खोडून काढला.

    “गेले काही दिवस सातत्याने एक प्रश्न विचारला जात होता की, विरोधी पक्षनेतेपदाबाबत दावा सांगणार आहात की नाहीत? शिवसेनेने आज विरोधी पक्षनेतेपदाबाबत दावा केलेला आहे. साहजिकच आहे, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार आहोत. इतर सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दलही चर्चा सुरु आहे. यापुढे सुद्धा चर्चा करु. आम्ही एकत्रितपणे याबद्दल निर्णय घेत राहू. पण आज मात्र विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आम्ही भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केली आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

    ‘बजेटपूर्वी विरोधी पक्षनेता असायला पाहिजे’

    “आम्हाला खात्री आहे की, लोकशाही मुल्यांचं पालन करुन लवकरात लवकर याबाबत निर्णय होईल आणि येत्या बजेटपूर्वी, कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेता असायला पाहिजे, जो जनतेच्यावतीने काही बोलू शकेल. आम्ही अपेक्षा अशी करतोय, मुख्यमंत्री ज्याप्रमाणे स्वच्छ कारभार करत आहेत. त्यांनी काल सांगितलं की, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची काल छेड काढली गेली. स्वत: मुख्यमंत्री बोलले की, कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दया, क्षमा दाखवली जाणार नाही. त्याचपद्धतीने याबाबतही निर्णय होईल, असं मला वाटतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
    Maha Vikas Aghadi : आतली बातमी! अडीच वर्षे विरोधी पक्षनेतेपद द्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी

    ‘अडीच-अडीच वर्षे असा काही फॉर्म्युला नाही’

    “विरोधी पक्षनेतेपदाबाबत अडीच-अडीच वर्षे असा काही फॉर्म्युला नाही. आम्ही एकत्रितपणे पुढे जात आहोत. बऱ्याच गोष्टी आहेत, निवडणुका असतील किंवा काही असतील तर पुढे बघू”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. “भाजपला विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव चालणार होतं हे मला आधी कळलं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे घराणेशाहीला त्यांचा विरोध नाही हे मला कळलं असतं तर बरं झालं असतं”, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed