• Tue. Sep 8th, 2026

रस्ते, इमारतींची कामे गुणवत्तापूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 28, 2025
रस्ते, इमारतींची कामे गुणवत्तापूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद

लातूर, दि. 28 : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात करण्यात येत असलेली रस्ते आणि इमारत बांधकामाची सर्व कामे गुणवत्तापूर्ण करण्याची काळजी घ्यावी. बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्ता याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, गणेश क्षीरसागर, अलका ढोके यांच्यासह उपअभियंता, सहायक अभियंता आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध भागातील रस्ते, इमारतींची काम विहीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करावे. या कामांना अभियंत्यांनी भेटी देवून कामांचा दर्जा तपासावा. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारे प्रत्येक काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. रस्त्यांच्या बाजूला, इमारत परिसरात वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातींच्या, विशेषतः अधिक प्रमाणात सावली देणाऱ्या वृक्ष लागवडीला प्राधान्य द्यावे, असे पालकमंत्री ना. भोसले यावेळी म्हणाले. तसेच कार्यालयीन स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञानाचा कामकाजात वापर आदी बाबींकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे पालकमंत्री यांनी यावेळी कौतुक केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. शेख यांनी लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते व इमारत बांधकामांची माहिती दिली. तसेच रस्त्यांवर निगराणी ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासोबतच रस्त्यांवरील खड्डे बुजविणे व इतर दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed