• Mon. Mar 9th, 2026

    उद्धव ठाकरेंनी बाह्या सरसावल्या, संकटात असलेल्या पक्षाला वाचवण्यासाठी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न, पडद्यामागे हालचाली काय?

    उद्धव ठाकरेंनी बाह्या सरसावल्या, संकटात असलेल्या पक्षाला वाचवण्यासाठी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न, पडद्यामागे हालचाली काय?

    शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आता चांगलेच कामाला लागले आहेत. पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे स्वत: आता या प्रक्रियेत सक्रिय राहणार आहेत. पक्षाला नवसंजीवनी मिळावी यासाठी उद्धव ठाकरे आता जंग जंग पछाडणार असल्याची माहिती आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या प्रचंड संघर्षातून जात आहे. त्यामागील कारणदेखील तसंच आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. आगामी काळात मुंबई महापालिकासह अनेक महत्त्वाच्या शहारांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. पण त्याआधी स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला धक्का बसताना दिसतोय. कोकणात तर ठाकरे गटाला खूप मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या या उपक्रमाला ‘ऑपरेशन टायगर’ हे नाव देण्यात आलं आहे. शिवसेनेचं ऑपरेशन टायगर हळूहळू यशस्वी होताना दिसत आहे. कारण ठाकरे गटाच्या अनेक नगरसेवकांचाही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताना दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. या घडामोडींची गंभीर दखल आता उद्धव ठाकरे यांच्याकडूनही घेण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

    उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने पक्षाच्या नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या जात आहे. पक्षाला नवसंजीवनी मिळावी यासाठी काय-काय करता येईल, याबाबत मंथन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाने सावध भूमिका घेतल्याची माहिती आहे. पक्षाचे नेते आता दर आठवड्याला बैठक घेणार आहेत. नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनात आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

    ठाकरेंच्या शिवसेनेत काय ठरलं?

    सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व नेत्यांची आता प्रत्येक मंगळवारी शिवसेना भवनात आढावा बैठक होणार आहे. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत. ठाकरे गटाचे नेते राज्यभर विविध ठिकाणी दौरे करणार आहेत. या दौऱ्यातून ते कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या देखील सोडवल्या जाणार आहेत.
    मोठी बातमी! कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्याचं सांगत धनंजय मुंडेंनी 500 आणि 200 कोटींचा काढला जीआर? दमानियांचा नवा बॉम्ब
    ठाकरे गट आता एकमेकांमध्ये समन्वय राखून संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे पक्षात येत्या काळात संघटनात्मक बदल सुद्धा होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या 14 जणांवर नेतेपदाची जबाबदारी आहे. या 14 नेत्यांची दर आठवड्याला मंगळवारी महत्त्वाची बैठक होणार आहे

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed