• Tue. Jun 16th, 2026

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 11, 2025
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान – महासंवाद




    नवी दिल्ली दि. 11 :  महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त होणे हे माझे सौभाग्य असल्याचे मी समजतो, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

    येथील महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. श्री. शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीयमंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप पाच लक्ष रुपये रोख, सन्मानचिन्ह व शिंदे शाही पगडी असे आहे. पुरस्काराची राशी आणि स्वतःकडून पाच लाख रुपये सरहद संस्थेला देण्याचे श्री. शिंदे यांनी मंचावरून जाहीर केले.

    श्री. शिंदे पुढे म्हणाले, महादजी शिंदे यांचे कर्तुत्व रणांगणावर जेवढे प्रखर होते तेवढेच ते कवी, अभंगकार म्हणूनही सुप्रसिद्ध होते. ग्वालेर येथील धृपद घराणे आणि खयाल गायकी घराण्याची कितीतरी गीते त्यांनी लिहिलेली आहेत. या त्यांच्या कार्याचा उल्लेख श्री. शिंदे यांनी केला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात पराक्रमी महादजी शिंदे यांचा इतिहास असावा यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

    महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार हा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना, भाऊंना आणि महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करीत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आपण आतापर्यंत काम करीत आहोत. आज मिळालेला हा पुरस्कार कामाची पोचपावती असल्याचे श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

    श्री. पवार यांनी यावेळी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमामुळे दिल्लीतील मराठी लोकांना मानसिक समाधान मिळत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक दिल्लीतील मराठी माणूस आपल्या परीने प्रयत्न करीत आहे.  साहित्य संमेलनानिमित्त मराठी माणसाला एक पर्वणीच लाभलेली असल्याचे श्री. पवार यावेळी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महादजी शिंदे यांच्या इतिहासातल्या नोंदी उलगडल्या. दिल्लीत वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या कर्तुत्ववान मराठी व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी केले. सूत्रसंचालन निवेदिता वैशंपायन यांनी तर आभार प्रदर्शन सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी केले. शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम यावेळी झाला.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed